मुंबई, १८ ऑगस्ट – मध्य भारतावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मुंबई महानगर प्रदेश आणि मराठवाड्यात १८ ते १९ ऑगस्टदरम्यान जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर आल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे.
कोकणासह नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. खान्देश आणि मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस तर विदर्भात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
रत्नागिरी, रायगड, सातारा आणि कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
रत्नागिरीतील नारंगी, जगबुडी आणि गड नद्यांना पूर आल्याने बाजारपेठा व शेतांमध्ये पाणी शिरले आहे. संगमेश्वर, कळंबूशी, नाईशी गावांचा संपर्क तुटला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. नांदेडमध्ये पैनगंगा व आसना नद्यांना पूर आला असून यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागली. चंद्रपूरमध्ये वर्धा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे.
जळगावमध्ये वाघूर नदीला पूर आला असून धाराशिवमधील तेरणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. नाशिकच्या येवला तालुक्यात पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. बीडमध्ये दमदार पावसाने १७ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. वाशिममध्ये ८० हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून २६१ गावांना फटका बसला आहे.
लातूर जिल्ह्यात पाच मार्गांवरील वाहतूक बंद झाली असून प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यात ढगफुटीसदृश पावसाने सहा गावे पाण्याखाली गेली असून दोन गावांतील ८० नागरिकांना वाचवण्यासाठी एसडीआरएफचे बचावकार्य सुरू आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील येलदरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सर्व १० दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून २३,८०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.