इस्लामाबाद, 16 ऑगस्ट – पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने भीषण रूप धारण केले असून, केवळ 48 तासांत 320 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील अनेक जिल्ह्यांत पूराने थैमान घातले असून रस्ते, पूल, इमारती आणि विद्युत यंत्रणा उद्ध्वस्त झाल्या आहेत.
बुनेर जिल्ह्यात सर्वाधिक 91 मृत्यू नोंदवले गेले आहेत. स्वातमध्ये 26 घरे, तीन शाळा आणि आठ सार्वजनिक इमारती कोसळल्या आहेत. दरम्यान, बचाव कार्यादरम्यान एक हेलिकॉप्टर कोसळून दोन वैमानिकांसह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेत 60 हून अधिक जण जखमी झाले असून अनेकजण बेपत्ता आहेत.
प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या माहितीनुसार, स्वात जिल्ह्यात सात घरे पूर्णपणे नष्ट झाली असून 38 घरे गंभीरपणे नुकसानग्रस्त झाली आहेत. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाच आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्गम भागांत मदत पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे, मात्र खराब हवामान व तुटलेले रस्ते यामुळे अडचणी येत आहेत.
रेस्क्यू टीमचे प्रवक्ते मोहम्मद सुहेल यांनी सांगितले की, आतापर्यंत 157 मृतदेह बाहेर काढले गेले असून, 100 हून अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. संचार सुविधा ठप्प असल्यामुळे मदतकार्याला विलंब होत आहे.
खैबर सरकारने पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी 50 कोटी पाकिस्तानी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. हवामान खात्याने 21 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मृतदेह खुले मैदानात ठेवून सार्वजनिक प्रार्थनेनंतर अंत्यसंस्कार केले जात आहेत.
गुरुवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे स्वात, बुनेर, बाजौर, तोरघर, मानसेहरा, शांगला आणि बट्टाग्राम हे जिल्हे सर्वाधिक बाधित असून, त्यांना आपत्तीग्रस्त क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.