मुंबई, १८ ऑगस्ट – पुढील तीन ते चार दिवस मुंबई आणि ठाणे परिसरात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. रविवारी रात्रीपासूनच पावसाने जोर धरला असून, याचा परिणाम रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे ५ ते १० मिनिटे उशिराने धावत आहेत.
हवामान विभागाने मुंबई आणि ठाण्यासाठी १९ ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट, तर २० ऑगस्टसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. सांताक्रूझ वेधशाळेने ८५ मिमी आणि कुलाबा वेधशाळेने ५५ मिमी पावसाची नोंद केली आहे. स्वयंचलित केंद्रांच्या माहितीनुसार फोर्टमध्ये १३४ मिमी, कॉटन ग्रीनमध्ये १४५ मिमी, ग्रँट रोडमध्ये १२१ मिमी तर लोअर परेलमध्ये १२९ मिमी पाऊस झाला आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासूनच्या पावसामुळे शहर आणि उपनगरांमध्ये वाहतूक कोंडी वाढली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवली ते वांद्रे दरम्यान वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून, पंधरा-वीस मिनिटांचा प्रवास दीड तासांपेक्षा अधिक वेळेत होत आहे. सायन सर्कल परिसरात आणि अंधेरी सबवेमध्ये पाणी साचले असून जवळपास एक फूट पाणी भरले आहे. पाऊस सुरूच राहिला तर सबवे बंद करण्याची शक्यता आहे.
सोमवारी सकाळपासून अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूझ आणि वांद्रे परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’ असे आवाहन केले आहे.
कोकणातही मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून, वाऱ्याचा वेग वाढल्याने किनारी भागांत परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे.