मुंबई, 15 जुलै, (हिं.स.)। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, शहराच्या अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर ठाणे, रायगड आणि पालघरसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन ते चार तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. प्रशासनाने मुंबईकरांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून पाणी तुंबलेल्या भागांपासून दूर राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, नाहूर, भांडूप यासह ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर या भागांमध्ये तुफान पाऊस सुरू आहे. नवी मुंबईमधील सायन-पनवेल महामार्ग, खारघर, बेलापूर, वाशी, नेरूळ आणि उरण परिसरात देखील पावसाने जोर धरला आहे. या सर्व ठिकाणी अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतुकीचा वेग मंदावला आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये – वांद्रे, अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली आणि मालाड या भागांमध्ये जोरदार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीवर याचा थेट परिणाम झाला असून अनेक वाहनचालक वाहनांमध्ये अडकले आहेत. अंधेरी सबवे तीन ते चार फूट पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी पोलिस, डी एन नगर आणि सहार वाहतूक पोलिसांकडून मार्ग वळविण्यात आले असून नागरिकांनी अंधेरी पूर्व-पश्चिम दरम्यान प्रवास करताना गोखले पूल वापरण्याचा सल्ला दिला आहे. महापालिकेचे कर्मचारी पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत. अंधेरी वेस्टमधील अंधेरी सबवे परिसरात सुमारे २ फूट पाणी साचल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून, वाहनचालकांना गोखले पुलाद्वारे मार्गक्रमण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे,” असे मुंबई वाहतूक पोलिसांनी ‘एक्स’ वर पोस्ट केले.
मुसळधार पावसाचा फटका रेल्वेसेवेवरही बसला आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल सेवेवर विलंब होत आहे. मध्य रेल्वेच्या गाड्या १५ ते ३० मिनिटं उशिराने धावत असून हार्बर लाईनवरील गाड्यांनाही १५ ते २० मिनिटांचा विलंब होत आहे. पश्चिम रेल्वेवरील गाड्या सध्या वेळेवर आहेत, मात्र पावसाचा जोर कायम राहिल्यास सेवा विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाचा परिणाम हवाई वाहतुकीवरही जाणवू लागला असून काही उड्डाणे उशिराने होत असल्याची माहिती मिळत आहे. इंडिगो एअरलाइन्सने आपल्या प्रवाशांसाठी सूचना जारी करत म्हटले आहे. स्पाइसजेटने देखील प्रवाशांना विमान वेळापत्रक तपासण्याचा सल्ला दिला आहे. “मुंबई मध्ये खराब हवामान (मुसळधार पावसामुळे) असल्याने सर्व आगमन/प्रस्थान आणि त्यानंतरच्या उड्डाणांवर परिणाम होऊ शकतो,” असे एक्स वर स्पाइसजेटने म्हटले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांतील नागरिकांचा आजचा दिवस पावसाच्या कहराने अक्षरशः ढवळून निघाला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाकडून मदत आणि आपत्ती व्यवस्थापनाची कामे सुरू आहेत.