छत्रपती संभाजीनगर, २९ ऑगस्ट. मराठवाड्यातील विविध भागांमध्ये गेल्या आठ दिवसापासून पावसाने कहर केला आहे. नांदेड, लातूर, परभणी जिल्ह्यात पहाटे साडेचार ते सहा वाजेपर्यंत झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. नांदेड आणि लातूर जिल्ह्यात भारतीय लष्करी दलाचे पथक पोहोचले असून पथक तैनात करण्यात आले आहे.
नांदेड शहरातील पूर परिस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल आणि लष्कर संयुक्तरीत्या मदत करतील, अशी माहितीही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे.
शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच विष्णुपुरी धरणाचे ८ दरवाजे उघडले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, कंधार, लोहा या तालुक्यांना पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका बसला आहे.
अशातच शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता नांदेड शहरात या ढगफुटी सदृश्य पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचले. सिडको परिसरातील घराघरात पावसाचे पाणी घुसले असून संसार उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
विष्णुपुरी धरणाचे ८ दरवाजे उघडले
विष्णुपुरी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता धरणाच्या आठ दरवाजातून गोदावरी नदी पात्रात ८८ हजार १४३ पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सदर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
लष्कराला केले पाचारण
नांदेड शहरातील पूर परिस्थिती लक्षात घेता संभाव्य मदतीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी लष्कराला पाचारण केले आहे.
