शिमला, 19 ऑगस्ट – हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री मुसळधार पावसानंतर लगघाटीच्या समाना भागात ढगफुटी झाली. यात तीन दुकाने आणि एक दुचाकी पुरात वाहून गेली असून, शेतांनाही मोठा फटका बसला आहे.
सरवरी नाला प्रचंड भरून वाहत असल्याने भूतनाथ मंदिराजवळील बस स्थानकाजवळील रस्त्यांवर तडे पडले आहेत. हनुमान बागला जोडणारा पादचारी पूल तुटण्याच्या स्थितीत आहे, तर सरवरी भागातील आणखी एक पादचारी पुलाला मोठे नुकसान झाले आहे.
जिल्हा प्रशासनाने मंगळवारी सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ढगफुटीचा आवाज ऐकून गावकरी घराबाहेर धावत सुटले, त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र नाल्याचे मलबा अनेक घरांमध्ये शिरले आहे. प्रशासनाने नदी-नाल्यांच्या काठावर राहणाऱ्या झोपडपट्टीतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे.
कुल्लूचे जिल्हाधिकारी तोरुल एस. रवीश यांनी सांगितले की, सततच्या मुसळधार पावसामुळे काही रस्ते बंद झाले आहेत आणि महामंडळाच्या बसेस थांबवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी नदी-नाल्यांच्या परिसरात न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.