हिंगोली, ५ ऑगस्ट – कावड यात्रा ही केवळ एक परंपरा नसून ती आपल्या सनातनी हिंदू धर्माचे प्रतीक आहे. या यात्रेमुळे शिवभक्तांमध्ये त्याग, समर्पण आणि एकजुटीचा संदेश पोहोचतो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीतील कावड यात्रेच्या समारोपप्रसंगी केले.
शिंदे म्हणाले, भगवान शंकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत होते, त्यामुळे शिवसेनेच्या नावातच ‘शिव’ आहे आणि ही संघटना सर्वसामान्य माणसासाठी झटणारी आहे. काँग्रेसच्या जोखडातून ही संघटना मुक्त करण्यासाठी सर्वांनी मिळून काम केल्याचा मला अभिमान आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या समारोप कार्यक्रमाला आमदार संतोष बांगर, हेमंत पाटील, बाबुराव कदम कोहळीकर, हिकमत उढाण, बालाजी पाटील खतगावकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शिंदे यांनी सांगितले की, काही नेते यापूर्वी कावड यात्रेला येण्याचे टाळत होते, परंतु त्यांनी पाठ फिरवल्यानंतर त्यांचे राजकीय अस्तित्व संपले. आम्ही जेव्हा शिवसेना वाचवण्यासाठी उठाव केला, तेव्हा संतोष बांगरने कोणताही विचार न करता साथ दिली. ५० आमदारांनी पाठिंबा दिला आणि ऑपरेशन तख्तापलट यशस्वी झाले.
मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात निधी वाटताना कधीही हात आखडता घेतला नाही. संतोष बांगर यांना २६०० कोटी रुपये विकासनिधी दिले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अडीच वर्षांत ४५० कोटी रुपये मंजूर केले. ‘लाडकी बहिण’ योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करते आणि ही योजना बंद होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दहशतवादाला धर्म नसतो म्हणणाऱ्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटानंतर भगवा दहशतवाद असल्याचे ठरवले. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना त्रास देण्यात आला. मतांसाठी हे सर्व होत असल्याचा आरोप करत, ऑपरेशन सिंदूरमधून पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र काहीजण फक्त विमाने आणि ड्रोन पडले का, ते विचारत आहेत.
शिंदे यांनी स्पष्ट केले की, हिंदुत्व ही जीवनशैली आहे. भगवा दहशतवादाचा रंग देणे हे हिंदू धर्माचा अपमान आहे. शिवरायांचा, वारकऱ्यांचा, प्रभू रामचंद्राचा भगवा दहशतवादी नाही. भगवा हा विकास, प्रगती आणि एकात्मतेचा रंग आहे.
स्थानिक निवडणुकांची तयारी करा
शिंदे यांनी कार्यकर्त्यांना महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.
आदिवासी उपोषणाबाबत आश्वासन
हिंगोली जिल्ह्यातील आदिवासी बांधव मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. त्याबाबत लवकरच मुख्यमंत्री एक सकारात्मक निर्णय घेतील, असे शिंदे यांनी सांगितले. उपोषण करणाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.