अमरावती, 15 जुलै (हिं.स.)आद्यसर संघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित युग प्रवर्तक डॉ. हेडगेवार हे दोन अंकी नाटकाचे दमदार सादरीकरण संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात झाले. सदर नाट्य प्रस्तुतीला प्रचंड प्रतिसाद अमरावतीकर जनतेने दिला. संपूर्ण सभागृह दर्शकांनी खचाखच भरलेले होते.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे प्रायोजित या नाट्य महानुभाव प्रयोगाचा शुभारंभ खासदार अनिल बोंडे, आमदार रवि राणा, अमरावती हानुभाव आश्रमाचे महंत कविश्वर कुळाचार्य मोहन महाराज, संघाचे विभाग संघचालक चंद्रशेखर भोंदू, महानगर संघचालक उल्हास बपोरीकर, भारत विकास परिषद अमरावती शाखा अध्यक्ष प्रा. डॉ. रविकांत कोल्हे, भारतीय उत्कर्ष मंडळ अमरावती शाखा अध्यक्ष दिलीप भुजाडे, नाटकाचे निर्मात व नादब्रह्माचे अध्यक्ष तसेच भारत विकास परिषदेचे नागपूर येथील प्रांताध्यक्ष पद्माकर धानोरकर यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून झाला.
सर्व कलाकारांनी समरस होऊन आविष्कार अभिनय केलेल्या या प्रयोगाने प्रेक्षकांना ३ तास अक्षरशः खिळवून ठेवले. डॉक्टर हेडगेवारांच्या जीवनातील विविध प्रसंग रोमहर्षक दृश्यांसह जिवंतपणे सादर केल्या गेले. त्यामध्ये प्रामुख्याने त्यांचे क्रांतिकारी जीवन, काँग्रेस पक्षातील त्यांचे सुभाष बाबू आणि महात्मा गांधी यांच्याशी असलेले संबंध, संघ स्थापनेची पार्श्वभूमी, गोळवलकर गुरुजींची भेट व संघामधील त्यांनी सक्रिय होण्याची आवश्यकता, संघकार्य देशभर पोहचावे यासाठी असलेली अत्यंतिक तळमळ, स्वप्नात सुद्धा भारत हे हिंदू राष्ट्र या संकल्पनांचा ध्यास घेऊन रक्ताचे पाणी कसे झाले इत्यादी प्रसंगांचे जिवंत प्रस्तुतीकरण सदर नाटकांमध्ये करण्यात आले.
प्रत्यक्ष संघाची पार्श्वभूमी नसणाऱ्या काही प्रेक्षकांनी आपले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल असलेले गैरसमज दूर झाल्याची प्रांजळ प्रतिक्रिया दिली. संघ स्थापनेची पार्श्वभूमी बघितल्यानंतर आज शिस्तबद्ध स्वयंसेवकांची फौज कुठल्याही फौज कुठल्याही आपदेच्या वेळी कशी सक्रिय होते याचे मूळ लक्षात आले. संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या या प्रेरक नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने डॉ. हेडगेवार यांचे तपस्वी चरित्र घराघरात पोहोचेल हे निश्चित, असेही मत अमरावतीकर नागरिकांनी व्यक्त केले.—————
