अमरावती, 12 एप्रिल (हिं.स.)
जगविख्यात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाबद्दल खुप ऐकलं होतं, आज या दिक्षांत समारंभाच्या माध्यमातून मंडळाची प्रत्यक्ष भेट, पाहणी आणि मंडळाच्या कार्याची माहिती झाली. स्वातंत्र्य काळापासून तर आजपर्यंत एखादी संस्था देशाच्या वाटचालीमध्ये समर्पित योगदान देत आहे हे खरोखर प्रेरणादायी व गौरवशाली आहे. मैदानी खेळ, कला-संस्कृती ते आधुनिक शिक्षणाचा प्रवास करतांना हजारो, लाखो विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व घडवत राष्ट्र उभारणीला बळ देणाऱ्या श्री हव्याप्र मंडळाला थेट क्रीडा विद्यापीठाचा दर्जा श्री हव्याप्र मंडळाच्या कार्याची फलश्रुती आणि अमरावतीचा गौरव आहे. या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी येथील वैभवशाली संस्कार आत्मसात करत एक उत्तुंग व्यक्तीमत्व साकार करत देश, समाज कार्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी राज्याच्या क्रीडामंत्री म्हणून मंडळाला मिळालेला क्रीडा विद्यापीठाचा दर्जा पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शासन स्तरावरील अडचणी दूर करत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे क्रीडा विद्यापीठ लवकरात लवकर सुरू होणार असल्याची ग्वाही राज्य क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे स्वायत्त डिग्री कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन महाविद्यालयाचा ११ दिक्षांत समारंभ मंडळाच्या अनंत क्रीडा मंदीर सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. या समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून क्रीडामंत्री भरणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष, मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष ॲड. प्रशांत देशपांडे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, उच्च तंत्र शिक्षण विभागाचे डॉ. सुबोध भांडारकर, मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे, मंडळाच्या सचिव व उपप्राचार्य डॉ. माधुरी चेंडके, सचिव प्रा. रवींद्र खांडेकर, सचिव डॉ. विकास एम. कोळेश्वर, डॉ. आराधना वैद्य, परीक्षा नियंत्रक डॉ. विजय पांडे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालयाच्या सर्व शाखेचे विभागप्रमुख उपस्थित होते. सर्व शाखेतील एकुण ३९ प्रतिभावंत विद्यार्थ्यांना १३ सुवर्ण, १३ रौप्य, १३ कांस्य पदक, प्रमाणपत्र देत त्यांना गौरव केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष ॲड. प्रशांत देशपांडे म्हणाले, क्रीडामंत्र्यांची श्री हव्याप्र मंडळाला झालेली भेट अविस्मरणीय ठरणार आहे. कारण, १९८४ नंतर राज्याचे क्रीडामंत्री यांनी मंडळाला भेट दिली.