मुंबई, 10 जुलै (हिं.स.) – राज्य मंत्रिमंडळातील शिवसेना गटाचे नेते, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपाहारगृह, जमीन खरेदी प्रकरणी विरोधकांकडून आरोप करण्यात आले होते. दरम्यान आता त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे.
याविषयी मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, आयकर विभाग असेल किंवा इतर विभाग असतील हे त्यांचे काम करत आहे. त्यात काही गैर नाही. वर्ष २०१९ आणि २०२४ मध्ये संपत्तीमध्ये झालेली वाढ यावर स्पष्टीकरण मागितले आहे, ते त्यांचे काम करत आहेत. काही लोकांना वाटते की, राजकीय पुढार्यांना काही कारवाई होत नाही, असे काही नाही. आयकर विभागाने मला नोटीस दिली असून मी त्याला उत्तर देणार आहे. काही लोकांनी माझ्या विरोधात आयकर विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची नोंद विभागाने घेत मला नोटीस पाठवली आहे. आयोगाने उत्तर देण्यासाठी ९ जुलैपर्यंतची मुदत दिली होती; पण आम्ही वेळ वाढवून मागितला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
संजय शिरसाट यांच्यावर झालेल्या विट्स हॉटेल आरोप प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विधानसभेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. मात्र कुठलीही शंका मनात नको, स्वतः संजय शिरसाट यांनी खुलासा केला आहे. टेंडरमध्ये चुकीचं असेल तर ते तपासू असे मुख्यमंत्री म्हणाले. तर आमच्या मंत्र्यांची जाणूनबुजून चौकशी लावलेली नाही असं दावा उदय सामंत यांनी केला आहे. त्यामुळे यावरून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी उदय सामंत यांच्यावर टीका करत मुख्यमंत्री मोठे आहेत की उदय सामंत मोठे आहेत असा सवाल उपस्थित केला आहे.