नवी दिल्ली, 29 जुलै – अमेरिका आणि चीनमधील व्यापार संघर्षामुळे भारतातून अमेरिकेत होणाऱ्या स्मार्टफोन निर्यातीत मोठी झेप पाहायला मिळाली आहे. २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत भारताने अमेरिकेतील स्मार्टफोन आयातीत ४४ टक्क्यांचा वाटा घेतला असून, यामध्ये अॅपलचा मोठा हिस्सा आहे.
कॅनॅलिस या मार्केट रिसर्च संस्थेच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी चीनचा अमेरिकेतील स्मार्टफोन पुरवठ्यात ६१% वाटा होता, तो आता २५% वर घसरला आहे. त्याउलट, भारताचा वाटा केवळ १३% वरून वाढून यंदा ४४% वर पोहोचला आहे – २४०% ची वार्षिक वाढ.
‘चायना प्लस वन’ धोरणाचा परिणाम
कॅनॅलिसचे प्रमुख विश्लेषक संयम चौरसिया म्हणाले, “अमेरिकेसाठी स्मार्टफोन उत्पादनात भारत प्रथमच आघाडीवर आला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अॅपलची चीनवर असलेली अवलंबन कमी करण्याची धोरणात्मक योजना — ‘चायना प्लस वन’.”
त्यांनी सांगितले की, अॅपलने भारतातून आयफोन १६ सिरीजच्या ‘प्रो’ मॉडेलचे उत्पादन सुरू केले असून, मुख्यत्वे ते अमेरिकन बाजारासाठी आहे. तरीही प्रो मॉडेलचा मोठ्या प्रमाणात पुरवठा अद्याप चीनमधूनच केला जातो.
सॅमसंग व मोटोरोलाही मैदानात
सॅमसंग आणि मोटोरोला या कंपन्यांनीही भारतातून अमेरिकेसाठी स्मार्टफोन पुरवठा वाढवला आहे. मात्र, या कंपन्यांचा पुरवठा प्रमाण आणि गतीने अॅपलच्या तुलनेत कमी आहे. मोटोरोला अजूनही चीनवर अवलंबून आहे, तर सॅमसंग व्हिएतनाममधील उत्पादन केंद्रांवर भर देत आहे.
उत्पादन क्षमतेत मोठी वाढ
अहवालानुसार, अॅपल सध्या भारतात सुमारे ४ कोटी युनिट्सचे उत्पादन करत असून, २०२६ पर्यंत हे प्रमाण ८ कोटी युनिट्सपर्यंत वाढवण्याची योजना आहे. यामुळे भारतात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात उद्योग, रोजगार आणि निर्यात क्षमतेला मोठा बळकटी मिळण्याची शक्यता आहे.