लंडन, 10 जुलै (हिं.स.)
भारत
आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना
आजपासून लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे. भारताच्या अंतिम अकरा क्रिकेटपटूंमध्ये एक बदल
निश्चित मानला जात आहे. जसप्रीत बुमराहचे पुनरागमन निश्चित आहे. या कसोटीत शुभमन गिल आणि ऋषभ पंत सारख्या
फलंदाजांकडून खूप अपेक्षा असतील.
गेल्या
काही दौऱ्यांमध्ये भारतीय संघाचा लॉर्ड्सवर उत्तम विक्रम आहे. २०२१ मध्येविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने
येथे ऐतिहासिक विजय मिळवला होता. आता चाहते शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय
संघाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे. दरम्यान,आतापर्यंत टीम इंडियाने लॉर्ड्सच्या मैदानावर
फक्त तीन कसोटी सामने जिंकले आहेत. या तीन कसोटींमध्ये वेगवेगळे कर्णधार होते आणि
वेगवेगळ्या क्रिकेटपटूंना सामनावीराचा पुरस्कारही मिळाला होता.
भारताने
१९३२ मध्ये लॉर्ड्सवर पहिली कसोटी खेळली होती. आतापर्यंत९३ वर्षांत टीम इंडियाने या मैदानावर एकूण १९ कसोटी सामने खेळले आहेत आणि यातील
केवळ तीन जिंकले आहेत. भारतीय संघाने १२ सामने गमावले आहेत आणि चार कसोटी अनिर्णित
राहिल्या आहेत. १९८६ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने येथे पाच
विकेट्सने विजय मिळवला होता. तर २०१४ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या
नेतृत्वाखाली टीम इंडियाने लॉर्ड्सवर ९५ धावांनी विजय मिळवला होता. २०२१ मध्येविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने येथे १५१
धावांनी विजय मिळवला होता. आता शुभमन गिलला लॉर्ड्सवर विजय मिळवणारा चौथा भारतीय
कर्णधार बनण्याची संधी आहे. अलीकडेच त्याच्या संघाने एजबॅस्टनवर इतिहास रचला आहे. भारतीय
संघ एजबॅस्टनवर कसोटी जिंकणारा पहिला आशियाई संघ बनला आणि गिल पहिला आशियाई
कर्णधार बनला होता. आता तो लॉर्ड्सवरही चमत्कार करण्याची त्याला नामी संधी आहे.