दुशान्बे, ९ सप्टेंबर : भारतीय पुरुष फुटबॉल संघाने सीएएफए नेशन्स कपमध्ये इतिहास रचला आहे. पेनल्टी शूटआउटमध्ये ओमानचा ३-२ असा पराभव करून भारतीय फुटबॉल संघाने या स्पर्धेमध्ये तिसरे स्थान पटकावले. ताजिकिस्तानमधील हिसोर सेंट्रल स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला होता. पश्चिम आशियातील या क्रमवारीत भारतापेक्षा वरच्या स्थानावर असलेल्या ओमानच्या संघाला पराभूत करण्याची भारताची ही पहिलीच वेळ होती.
हिसोर सेंट्रल स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात निर्धारित वेळेपर्यंत सामना १-१ ने बरोबरीत राहिला होता. भारताकडून उदांता सिंगने बरोबरी साधली. त्यानंतर सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला.पेनल्टी शूटआउटमध्ये ओमानने पहिल्या दोन संधी गमावल्या. भारताचा गोलकीपर गुरप्रीत सिंग संधूने शेवटचा पेनल्टी वाचवून संघाला विजय साकारुन दिला.भारताकडून ललियानझुआला छांगटे, राहुल भेके आणि जितिन एमएस यांनी शूटआउटमध्ये गोल केले, तर अन्वर अली आणि उदांता यांना गोल करण्यात अपयश आलं.
दोन्ही संघांनी आपापल्या गटात दुसरे स्थान मिळवले होते. त्यानंतर हा सामना तिसऱ्या स्थानासाठी खेळवण्यात आला. २००० पासून भारत आणि ओमान यांच्यात नऊ सामने झाले आहेत, त्यापैकी सहा वेळा भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोन्ही संघ मार्च २०२१ मध्ये शेवटचे आमनेसामने आले होते. तेव्हा हा सामना १-१ ने बरोबरीत सुटला होता.