नवी दिल्ली, 20 ऑगस्ट – भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पुन्हा एकदा पाकिस्तानचा काळा चेहरा जगासमोर आणला. भारताचे प्रभारी अधिकारी एल्डोस पुन्नूस यांनी मंगळवारी (दि.१९) स्पष्ट केले की पाकिस्तान आणि त्याची सेना महिलांवर व मुलींवर लैंगिक अत्याचारांचा वापर ‘हत्यार’ म्हणून करीत आली आहे आणि आजही करत आहे.
“सशस्त्र संघर्ष-संबंधित लैंगिक हिंसा” या विषयावरील चर्चेत पुन्नूस म्हणाले, “१९७१ मध्ये पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तानमध्ये (आताचा बांगलादेश) लाखो महिलांवर अमानुष लैंगिक अत्याचार केले. हा लाजिरवाणा व भयावह पॅटर्न आजही सुरू आहे. पाकिस्तानातील अल्पसंख्याक महिलांवर होणारे अत्याचार आजही चिंताजनक आहेत.”
भारताने आठवण करून दिली की धार्मिक व जातीय अल्पसंख्याकांवर अपहरण, तस्करी, सक्तीचे विवाह, जबरदस्ती धर्मांतर आणि लैंगिक हिंसेच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असून त्याचे पुरावेही आहेत. अलीकडील ओएचसीएचआरच्या अहवालातही याचा उल्लेख आहे.
पुन्नूस म्हणाले, “ही मोठी विडंबना आहे की जे अपराध करतात, तेच न्यायाचे पुरस्कर्ते असल्याचा दिखावा करतात. गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे, कारण या अपराधांचे परिणाम केवळ व्यक्तींवर नाहीत तर पिढ्यानपिढ्या संपूर्ण समाजावर होतात.”
भारताने या हिंसेचा तीव्र शब्दांत निषेध केला आणि अशा गुन्ह्यांत सहभागी असलेल्या व्यक्तींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.
यावेळी भारताने आपले योगदानही अधोरेखित केले. 2007 मध्ये भारताने लाइबेरियामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मिशनमध्ये केवळ महिलांची विशेष पोलीस तुकडी पाठवून इतिहास घडवला होता. आज भारत MONUSCO, UNICEF आणि UNMAS मध्ये महिला तुकड्या यशस्वीरित्या तैनात करत आहे. दिल्लीतील संयुक्त राष्ट्र शांती स्थापनेसाठी असलेल्या केंद्रात महिलांच्या सहभागासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते, ज्यात लैंगिक हिंसा रोखण्यावर भर असतो.
शेवटी पुन्नूस यांनी सांगितले की, भारत आपला अनुभव व तज्ज्ञता इतर इच्छुक देशांशी शेअर करण्यास तयार आहे आणि यावर जागतिक दक्षिणेकडील महिला शांतिदूतांच्या परिषदेतही चर्चा झाली आहे.
