नवी दिल्ली, 23 जुलै – पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई केली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव अधिकच वाढला. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यास बंदी घातली होती. ही बंदी आता २३ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
मंगळवारी (दि. २२) मुरलीधर मोहोळ यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट करत बंदीवाढीची घोषणा केली.
“पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्यास प्रतिबंध करणारी ‘नोटिस टू एअरमेन’ (NOTAM) अधिकृतरित्या २३ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ही निर्णय सुरक्षा धोरणांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे.” असे त्यांनी सांगितले.
या निर्बंधांबाबत आणखी अपडेट्स लवकरच जाहीर करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच, पाकिस्तानने देखील भारतीय विमान कंपन्यांसाठी आपली हवाई हद्द बंद ठेवण्याचा निर्णय एका महिन्यासाठी, म्हणजेच २४ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवला आहे, अशी माहिती पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाने दिली.
ही बंदी २४ ऑगस्ट रोजी सकाळी ५.१९ वाजेपर्यंत लागू राहणार असल्याचे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, २३ ते २५ जुलैदरम्यान राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेवर भारतीय हवाई दलाचे विशेष युद्धसराव (Air Force Exercise) आयोजित करण्यात आले असून, त्या पार्श्वभूमीवरही NOTAM जारी करण्यात आला आहे.
भारत-पाकिस्तानमधील वाढता तणाव आणि सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता दोन्ही देशांनी हवाई बंदीची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.