अमरावती, २५ जुलै – भारताने स्वदेशी संरक्षण क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने आज आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथील नॅशनल ओपन अॅक्सेस रेंज (NOAR) येथे ‘यूएव्ही-लाँच्ड प्रिसिजन गाइडेड मिसाईल’ (ULPGM) व्हर्जन 3 ची यशस्वी चाचणी केली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती देताना सांगितले की, “ही चाचणी भारताच्या संरक्षण क्षमतेला बळकटी देणारी आहे. DRDO, संबंधित खाजगी उद्योग, MSMEs आणि स्टार्टअप्स यांचे यशाबद्दल अभिनंदन. ही चाचणी भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे नेणाऱ्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.”
ULPGM-V3 क्षेपणास्त्राबाबत सविस्तर माहिती गोपनीय ठेवण्यात आली असली, तरी यात अत्याधुनिक इमेजिंग इन्फ्रारेड (IIR) सीकर आणि ड्युअल-थ्रस्ट प्रोपल्शन सिस्टम तंत्रज्ञानाचा वापर झाल्याचे मानले जात आहे. हे क्षेपणास्त्र हलके, अचूक मार्गदर्शनक्षम आणि विविध मानवरहित हवाई यंत्रणांशी (UAVs) सुसंगत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आधुनिक युद्धस्थितींमध्ये दूरस्थ, अचूक प्रहार करणे अधिक प्रभावी होणार आहे.
कुर्नूल येथील NOAR क्षेत्राची निवड ही DRDOच्या प्रगत चाचणी यंत्रणेचे प्रतीक मानली जाते. येथे अलीकडेच हाय एनर्जी लेसर शस्त्रे आणि ड्रोन न्यूट्रलायझेशन सिस्टम्स यांसारख्या अत्याधुनिक प्रणालींच्या चाचण्या देखील घेण्यात आल्या आहेत.
ही यशस्वी चाचणी म्हणजे DRDO आणि खासगी उद्योग, MSMEs आणि स्टार्टअप्स यांच्यातील समन्वयाचे फळ असून भारताच्या ‘आत्मनिर्भर संरक्षण धोरणाचे’ एक ठोस उदाहरण मानले जात आहे. भारताचे संरक्षण क्षेत्र अधिक सक्षम आणि स्वदेशी तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दिशेने ही मोठी झेप आहे.
