नवी दिल्ली, 16 ऑगस्ट – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्का येथे झालेल्या शिखर परिषदेचे भारताने स्वागत केले आहे. ही चर्चा जागतिक शांततेसाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.
जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, भारताला विश्वास आहे की भविष्यातील मार्ग संवाद आणि कूटनीतीद्वारेच निघेल. जगाचे लक्ष सध्या युक्रेन युद्धावर केंद्रित आहे आणि सर्व देशांना या संघर्षाचा तातडीने शेवट व्हावा, अशी अपेक्षा आहे. युद्ध हा कोणत्याही समस्येचा उपाय नसून संवाद आणि परस्पर समजूत हाच मार्ग असल्याचे भारताचे भूमिकेतून अधोरेखित करण्यात आले.
शिखर बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
-
समझौता अद्याप नाही: ट्रम्प यांनी सांगितले की कोणत्याही मोठ्या करारावर शिक्कामोर्तब झालेले नाही. काही मुद्द्यांवर मतभेद कायम असून पुढील चर्चा गरजेची आहे.
-
चीनवरील टॅरिफ: ट्रम्प यांनी जाहीर केले की रशियन तेल खरेदीबाबत चीनवर लावले जाणारे टॅरिफ सध्या टाळले जातील. मात्र भारताबाबत कोणतीही भूमिका त्यांनी स्पष्ट केली नाही.
-
पुतिनची प्रतिक्रिया: पुतिन यांनी चर्चेचे स्वागत केले व ट्रम्प यांच्या ‘मैत्रीपूर्ण’ भूमिकेचे कौतुक केले. मात्र, युक्रेनमधील नागरी मृत्यूंवर ट्रम्प यांनी मौन बाळगल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्न निर्माण झाले आहेत.
-
संयुक्त पत्रकार परिषद: बैठक संपल्यानंतर केवळ 15 मिनिटांची पत्रकार परिषद झाली. यात दोन्ही नेत्यांनी औपचारिक विधान केले, पण कोणताही ठोस करार जाहीर झाला नाही.
-
पुढील बैठक: ट्रम्प यांनी संकेत दिला की पुतिन व युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात लवकरच बैठक होऊ शकते, ज्यामध्ये ते स्वतःही सहभागी होऊ शकतात. मात्र वेळ आणि ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही.