नवी दिल्ली, ७ ऑगस्ट –
“शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. भारत कधीही आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार भाऊ-बहिणींच्या हितांशी तडजोड करणार नाही,” असे ठाम मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांवर अप्रत्यक्ष टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “मला माहीत आहे की, वैयक्तिकरित्या मला यासाठी मोठी किंमत मोजावी लागू शकते, पण त्यासाठी मी तयार आहे.”
पंतप्रधान मोदी गुरुवारी नवी दिल्लीतील एम. एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झाले होते. यावेळी ते कृषी धोरणांबाबत बोलत होते.
ते म्हणाले की, “सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी सातत्याने काम करत आहे. आमच्या सरकारने केवळ मदतीपुरते उपाय केले नाहीत, तर शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचाही प्रयत्न केला आहे.”
पंतप्रधान मोदींनी शेतीसंदर्भातील विविध योजनांची माहिती देताना सांगितले की,
-
पंतप्रधान किसान सन्मान निधीमुळे लहान शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळाली.
-
पीक विमा योजना शेतकऱ्यांना जोखमीपासून सुरक्षित ठेवते.
-
कृषी सिंचन योजनाद्वारे सिंचनाच्या अडचणी दूर केल्या जात आहेत.
-
१०,००० एफपीओच्या स्थापनेमुळे लहान शेतकऱ्यांना संघटित बळ प्राप्त झाले.
-
ई-नाममुळे उत्पादन विक्री अधिक सुलभ झाली आहे.
अमेरिकेने ७ ऑगस्टपासून भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के अतिरिक्त शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. २७ ऑगस्टपासून हे शुल्क आणखी वाढणार असून, भारताने या निर्णयाचा निषेध केला आहे. यामुळे भारतीय शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींचे हे विधान भारत सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही कठोर निर्णयाला तयार असल्याचे अधोरेखित करते.