नवी दिल्ली, 15 ऑगस्ट – देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला ठाम इशारा दिला. “न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग आजवर सहन केले, पण आता अजिबात सहन करणार नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगत राष्ट्रीय सुरक्षेबाबत सरकारची कठोर भूमिका अधोरेखित केली.
ते म्हणाले, दहशतवाद पसरवणारे आणि त्यांना साथ देणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी सैन्य दलांना पूर्ण मोकळीक देण्यात आली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’चे उदाहरण देत त्यांनी जवानांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले. “शत्रूंना त्यांच्या कल्पनेपेक्षाही कठोर शासन आपल्या जवानांनी दिलं,” असे ते म्हणाले.
मोदींनी स्वातंत्र्यलढा, संविधान आणि राष्ट्रीय एकतेचे स्मरण करत सांगितले की, हे पर्व 140 कोटी भारतीयांचा अभिमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, सरदार पटेल आदी महापुरुषांच्या योगदानाचा त्यांनी गौरव केला आणि नारीशक्तीचे विशेष कौतुक केले.
आज डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 125वी जयंती असल्याचे सांगून त्यांनी कलम 370 हटवून ‘एक देश, एक संविधान’ हे स्वप्न पूर्ण झाल्याचे नमूद केले. “आजचा भारत आत्मविश्वासाने भरलेला आहे आणि प्रत्येक नागरिक प्रगतीसाठी योगदान देत आहे,” असेही त्यांनी म्हटले.