नवी दिल्ली, २ सप्टेंबर. एकीकडे भारत आणि अमेरिका यांच्यात टॅरिफ युद्ध चालू आहे, तर दुसरीकडे भारतीय सेना अमेरिकन सेनेसोबत युद्धसरावासाठी अमेरिकेकडे रवाना झाली आहे. अमेरिका मधील अलास्का येथील फोर्ट वेनराइट येथे १ ते १४ सप्टेंबर दरम्यान भारत-अमेरिका संयुक्त सैन्य युद्धाभ्यासाचा २१वा संस्करण पार पडणार आहे. या युद्धाभ्यासामध्ये मद्रास रेजिमेंटचे जवान अमेरिकेच्या ११व्या एअरबोर्न डिव्हिजनच्या आर्क्टिक वुल्व्ह्स ब्रिगेड कॉम्बॅट टीमच्या पहिल्या बटालियन, ५व्या इन्फंट्री रेजिमेंट “बॉबकॅट्स”च्या सैनिकांसोबत संयुक्त प्रशिक्षण घेणार आहेत.
दोन आठवडे चालणाऱ्या या युद्धाभ्यासात दोन्ही देशांचे सैन्यदल विविध सामरिक कारवायांचा सराव करतील. यामध्ये हेलिबॉर्न ऑपरेशन्स, देखरेख व मानवरहित हवाई प्रणालींचा वापर, रॉक क्राफ्ट, पर्वतीय युद्ध, जखमींची वाहतूक, रणांगणावर वैद्यकीय मदत आणि तोफखाना, हवाईदल व इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालींचा एकत्रित वापर यांचा समावेश आहे.
अभ्यासादरम्यान दोन्ही देशांचे विविध क्षेत्रांतील सामरिक तज्ज्ञ कार्यशाळा घेतील, ज्यामध्ये यूएएस व काउंटर-यूएएस ऑपरेशन्स, माहिती युद्ध, संवाद प्रणाली व पुरवठा व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश असेल.
या संयुक्त युद्धाभ्यासाचा समारोप सामूहिकरीत्या नियोजित व अंमलात आणलेल्या सामरिक कारवायांनी होईल. यामध्ये थेट गोळीबार सरावापासून ते उंचावरील कठीण भागात युद्धस्थितीच्या सरावाचा समावेश असेल. या अभ्यासाचा मुख्य उद्देश संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांसाठी सामरिक क्षमता वाढवणे व बहुपरिस्थितिक आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्जता वाढवणे हा आहे.
या संयुक्त युद्धाभ्यासात भारताकडून ४५० सैनिक सहभागी होणार आहेत. ही संख्या आतापर्यंतच्या सर्व युद्धाभ्यासांपेक्षा सर्वाधिक आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त युद्धाभ्यास २००४ सालापासून सुरू आहे. हा सराव दरवर्षी होतो. एका वर्षी भारतात आणि पुढच्या वर्षी अमेरिकेत होतो. अमेरिकेत होणारे बहुतेक युद्धाभ्यास अलास्कामध्ये होतात, तर भारतात हे प्रामुख्याने उत्तराखंडमधील रानीखेत येथे होतात. २०२२ साली प्रथमच ओली या उच्च भूभागात हा सराव झाला होता. याशिवाय हे युद्धाभ्यास राजस्थानमधील महाजनमध्येही पार पडले आहेत.
