नवी दिल्ली, ०७ सप्टेंबर : भारतीय पुरुष कंपाऊंड तिरंदाजी संघाने इतिहास रचला आहे. कोरियातील ग्वांगझू येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद २०२५ मध्ये कंपाऊंड पुरुष सांघिक स्पर्धेत फ्रान्सचा पराभव करून भारतीय संघाने प्रथमच सुवर्णपदक पटकावण्याची किमया साधली आहे.
ऋषभ यादव, अमन सैनी आणि प्रथमेश फुगे यांच्या भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रत्येक क्षणी संयम राखला आणि उत्कृष्ट कामगिरी केली. कंपाऊंड पुरुष सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघ पहिल्या सेटमध्ये फ्रेंच प्रतिस्पर्धी निकोलस गिरार्ड, जीन फिलिप बाउल्च आणि फ्रँकोइस दुबॉइस यांच्यापेक्षा ५९-५७ असा मागे पडला होता. पण भारतीय तिरलंदाजांनी दुसऱ्या सेटमध्ये जोरदार पुनरागमन केले. आणि ६०-५८ च्या फरकाने विजय मिळवत गुणांची बरोबरी केली. तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही संघांकडून गुणांची बरोबरी झाली. शेवटी भारतीय संघाने चौथ्या सेटमध्ये ५९ गुण मिळवले, तर फ्रेंच संघाला फक्त ५७ गुण मिळवता आले. अशाप्रकारे भारतीय संघाने दोन गुणांची आघाडी घेतली आणि फ्रान्सला २३५-२३३ च्या फरकाने पराभूत करत सुवर्णपदक जिंकले.
ज्योती सुरेखा वेन्नम आणि ऋषभ यादव या भारतीय मिश्र जोडीने कंपाउंड मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. भारतीय तिरंदाजी जोडीने नेदरलँड्सच्या माइक श्लोसर आणि सॅन डी लाट यांच्याविरुद्ध रोमांचक अंतिम फेरीत १५५-१५७ असा पराभव पत्करला. पहिल्या सेटमध्ये भारतीय तिरंदाजांनी ३९-३८ अशी आघाडी घेतली होती. पण त्यानंतरच्या सेटमध्ये ते मागे पडले. ज्यामुळे संघ अंतिम फेरीत पराभूत झाला. आणि भारतीय संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.