लंडन, 10 जुलै, (हिं.स.)
भारतीय
महिला क्रिकेट संघाने इंग्लंडच्या भूमीवर एक नवा इतिहास रचला आहे. त्यांनी चौथ्या
टी-२० सामन्यात इंग्लंडला पराभूत करत पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये टी-२०
आंतरराष्ट्रीय मालिका जिंकली आहे. हा विजय भारतीय महिला क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे.
भारत आणि इंग्लंड महिला संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या पाच
सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने शानदार कामगिरी केली,. आणि इंग्लंडचा ६ विकेट्सने पराभव केला. या
विजयासह भारतीय महिला संघाने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी
मिळवली आहे. या सामन्यात भारतीय महिला क्रिकेटपटूंनी आपल्या लौकीकला साजेशी कामगिरी
केली. ज्यामध्ये फलंदाज आणि गोलंदाज दोघांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.
१२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय
महिला संघाने आक्रमक सुरुवात केली. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी शानदार
सुरुवात केली. दोघांनीही ७ षटकांत ५६ धावा काढत या सामन्यावर संपूर्ण नियंत्रण
मिळवले. स्मृतीने ३२ धावा आणि शेफालीने ३१ धावा केल्या. त्यानंतर जेमिमा आणि
कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी संयमाने खेळ करत भारताचा विजय निश्चित केला. जेमिमाने
नाबाद २४ धावा केल्या, तर कर्णधार हरमनप्रीतने २६ धावा केल्या. भारतीय महिला संघाने हे
लक्ष्य केवळ १७ षटकांत पूर्ण केले आणि इंग्लंडमध्ये ऐतिहासिक टी-२० मालिका जिंकली.