नवी दिल्ली, 23 जुलै – भारत-चीन संबंधांमध्ये सकारात्मक बदल घडवत भारत सरकारने चिनी नागरिकांसाठी तब्बल ५ वर्षांनंतर पुन्हा टुरिस्ट व्हिसा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २४ जुलै २०२५ पासून चिनी नागरिकांना भारतात पर्यटनासाठी व्हिसा मिळणार असून, बीजिंगमधील भारतीय दूतावासाने बुधवारी (दि. २३) यासंबंधी अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे.
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मेस्त्री सध्या दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातच त्यांनी टुरिस्ट व्हिसा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. यासोबतच दूतावासाने व्हिसा प्रक्रियेबाबत माहिती देणारी नोटीसही प्रसिद्ध केली आहे.
व्हिसा प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे:
-
चिनी नागरिकांना भारतात येण्यासाठी ऑनलाइन टुरिस्ट व्हिसासाठी अर्ज करावा लागेल.
-
अर्जाची प्रिंटआउट घेऊन वेब लिंकवर अपॉइंटमेंट बुक करावी लागेल.
-
भारतीय व्हिसा अर्ज केंद्रात जाऊन अर्ज, पासपोर्ट आणि आवश्यक कागदपत्रांसह ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
-
पासपोर्ट विथड्रॉवल लेटर देखील आवश्यक असेल.
दूतावासाने स्पष्ट केले आहे की, व्यावसायिक व विद्यार्थ्यांसाठी आधीच व्हिसा सेवा सुरू करण्यात आली आहे, मात्र सामान्य प्रवाशांवर अजूनही काही मर्यादा लागू आहेत.
पार्श्वभूमी:
कोविड-१९ महामारीच्या काळात चीनमधून व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर भारत आणि चीनमध्ये तणाव वाढला होता. गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षामुळे दोन्ही देशांमधील पर्यटन, व्यापार आणि संपर्क पूर्णपणे थांबले होते. त्यामुळे ५ वर्षांपूर्वी भारताने चिनी नागरिकांना टुरिस्ट व्हिसा देणे बंद केले होते.
संबंध सुधारण्याच्या दिशेने पावले:
सद्यस्थितीत भारत आणि चीनमधील राजनैतिक व लष्करी चर्चांमध्ये संबंध सुधारण्यावर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून हवाई सेवा, यात्रेकरूंची सोय, आणि आता व्हिसा सेवा पुन्हा सुरू करण्यात येत आहे. विशेषतः कैलास मानसरोवर यात्रेसाठी भारतीय नागरिकांना परवानगी देण्याबाबत दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे.
भारत सरकारच्या या निर्णयामुळे भारत-चीन संबंधांमध्ये नव्या पर्वाची सुरुवात होण्याची शक्यता आहे