मुंबई, 17 जुलै
दिल्लीहून गोव्याकडे निघालेल्या इंडिगोच्या फ्लाइट क्रमांक 6E6271 या विमानाचे मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडींग करण्यात आले. विमानातील इंजिन क्रमांक 1 मध्ये तांत्रिक बिघाड आढळल्याने वैमानिकाने उड्डाणादरम्यान “पॅन-पॅन-पॅन” सिग्नल दिला, जो एका गंभीर पण जीवघेण्या टप्प्यापूर्वीचा इशारा असतो.
काय घडलं नेमकं?
विमानात एकूण 191 प्रवासी उपस्थित होते. 16 जुलैच्या रात्री 9:32 वाजता, पायलटला इंजिनमध्ये बिघाड जाणवला. त्यानंतर त्याने मुंबई एअर ट्रॅफिक कंट्रोलला संपर्क साधून मार्ग बदलण्याची विनंती केली. मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडींगच्या तयारीनुसार अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या.
यशस्वी लँडींग
विमानाने रात्री 9:53 वाजता, म्हणजेच नियोजित वेळेच्या दोन मिनिटे आधी, मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे लँडिंग केलं. सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
इंडिगोचे अधिकृत निवेदन
इंडिगोने दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं की, तांत्रिक बिघाडाच्या पार्श्वभूमीवर मार्ग बदलून मुंबईत लँडिंग करण्यात आलं.
-
विमान सेवेत पुन्हा आणण्यापूर्वी संपूर्ण तांत्रिक तपासणी केली जाईल.
-
प्रवाशांना झालेल्या अस्वस्थतेबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.
-
या प्रसंगी वैमानिक आणि क्रूने दाखवलेली तत्परता आणि दक्षता प्रशंसनीय असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलं.
