सोलापूर, 28 एप्रिल (हिं.स.)।
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून जिल्ह्यातील 158 वसतीगृहांतील भौतिक सुविधांची तपासणी केली. ज्या वसतीगृहात भौतिक सुविधा नसतील, त्या वसतीगृहांवर कारवाई होणार आहे.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे यांनी जिल्ह्यातील वसतीगृहांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा आणि तालुकास्तरावरील अधिकार्यांना दिले होते. त्यानुसार एका दिवसात जिल्ह्यातील सर्वच वसतीगृहांची तपासणी केली.
तालुकास्तरावरील सहायक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकार्यांसह अनेक अधिकार्यांनी वसतिगृहांना अचानक भेटी देऊन वसतीगृहात शौचालये आहेत का, पाण्याची सोय, वसतिगृहात किती विद्यार्थी हजर आहेत, हजेरी पुस्तकात किती विद्यार्थ्यांची हजेरी लावली आहे, अशा विविध बाबींची तपासणी केली.