पुणे, 26 मे, (हिं.स.)। मागील वर्षी खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर त्याची पूर्वसूचना नागरिक, तसेच पालिकेला देण्यात आली नव्हती. त्यामुळे शहरातील सिंहगड रोड परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले होते, असा आरोप नागरिकांनी केला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ही बाब अंत्यंत गांभीर्याने घेतली आहे.
धरणातून पाणी सोडण्याच्या आधी यंत्रणेला सज्ज होण्यासाठी दोन तास आधी सूचना देण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. धरणातून विसर्ग करण्याचा इशारा यंत्रणा भोंग्याच्या स्वरूपात पाणी शिरण्याचा धोका असलेल्या ठिकाणी कायमस्वरुपी बसवावी. त्याची माहिती पालिकेच्या नियंत्रण कक्षाने नागरिकांना द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जलसंपदा विभागाकडून पूरस्थितीमध्ये नदीमध्ये धरणातून किती क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्यानंतर शहरातील कोणकोणत्या भागांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, याची माहिती महापालिकेला देण्यात आली आहे.
उदाहरणार्थ किती क्युसेक पाणी सोडले, तर भिडे पूल पाण्याखाली जातो. एकतानगर सोसायटीत किती क्युसेक पाणी आल्यावर ते घरांमध्ये शिरते, याची माहिती देण्यात आली. यासह सर्वसाधारण पाण्याची पातळी, सावधानतेची पातळी, धोक्याची पातळी आणि आपत्तीची पाणीपातळी या बाबीसद्धा समजून सांगण्यात आल्या.