नवी दिल्ली, 24 एप्रिल (हिं.स.) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) देशाच्या सीमांच्या संरक्षणात महत्त्वाचे योगदान देणार आहे. सीमांचे संरक्षण आणि निगराणीसाठी इस्त्रो विशेष गुप्तचर उपग्रहाच्या (स्पाय सॅटेलाईट) निर्मीतीवर वेगाने काम करीत आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार इस्त्रो लवकरच एक विशेष “रडार इमेजिंग उपग्रह” प्रक्षेपित करण्यास सज्ज आहे. हा उपग्रह दिवसा व रात्री, तसेच ढगाळ हवामानातही चित्रण करू शकतो. त्यामुळे कोणत्याही हवामानात, कोणत्याही वेळेला, भारताच्या सीमेवर घडणाऱ्या घडामोडींवर नजर ठेवणे शक्य होणार आहे. हा उपग्रह “स्पाय सॅटेलाइट” म्हणून ओळखला जातो कारण त्याच्यापासून लपणे फार कठीण आहे. हा आकाशातील एक अचूक निरीक्षक आहे.
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, इस्त्रो लवकरच पीएसएलव्ही-सी61 मोहीमेंतर्गत अत्याधुनिक ईओएस-09 उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. सी-बँड सिंथेटिक अपर्चर रडारने सुसज्ज असलेला ईओएस-09 उपग्रह कोणत्याही हवामानात, दिवसा अथवा रात्री, पृथ्वीच्या पृष्ठभागाचे हाय-रिझोल्यूशन चित्र घेण्यास सक्षम आहे. हा रडार इमेजिंग उपग्रह पूर्णतः भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केला आहे, आणि तो भारताच्या आंतराळात कार्यरत असलेल्या 50 हून अधिक उपग्रहांच्या ताफ्यात सामील होणार आहे. भारताचा आधीपासून कार्यरत असलेला कार्टोसॅट-3 उपग्रह कमी पृथ्वी कक्षेतून अर्धा मीटरपेक्षा कमी रिझोल्यूशनमध्ये चित्रे पाठवू शकतो. मात्र, तो उपग्रह रात्री चित्रण करू शकत नाही, ज्यामुळे शत्रू आपली साधने हालवू शकतो. पण, नवीन ईओएस-09 उपग्रह रात्री देखील काम करतो त्यामुळे शत्रू काय लपवत आहे हे सतत शोधून काढू शकतो.
इस्त्रोने 1975 पासून आतापर्यंत एकूण 129 भारतीय उपग्रह आणि 342 परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. म्हणजेच एकूण 417 उपग्रह इस्रोने आत्तापर्यंत प्रक्षेपित केले आहेत. त्यापैकी 21 उपग्रह संचार, 8 उपग्रह नेव्हिगेशन, 21 उपग्रह पृथ्वी निरीक्षण आणि 3 उपग्रह विज्ञान या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. सन 2009 मध्ये सोडलेला रि-सॅट-2, त्यानंतर 2019 मध्ये सोडण्यात आलेले रिसॅट-2बी आणि रिसॅट-2बीआर-1, एप्रिल 2019 मध्ये सोडलेला EMISAT, Cartosat-2 Series तसेच फेब्रुवारी 2022 मध्ये प्रक्षेपित केलेला ईओएस-04 (रिसॅट-1ए) या उपग्रहाचा वापरही लष्करी कारणांसाठी केला जातो. याशिवाय यंदा 2025 मध्ये ईओएस-09 प्रक्षेपित केला जाणार आहे.