नवी दिल्ली , 12 सप्टेंबर। नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन हे विजयी झाले होते. देशाचे नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज, 12 सप्टेंबर रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारमंधील मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मात्र या उपस्थितांमध्ये माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यावर पहिल्याच दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर 22 जुलैला जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वस्थ्याचं कारण देत उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर ही पहिली वेळ होती, जेव्हा धनखड सार्वजनिकरीत्या दिसले. त्यांच्या अनुपस्थितीबाबत विरोधकांकडून सतत प्रश्न विचारले जात होते की ते नेमके कुठे आहेत आणि त्यांची तब्येत कशी आहे. त्यामुळं धनखड यांच्या या सार्वजनिक उपस्थितीमुळे विरोधकांचे प्रश्नही संपल्याचे दिसत आहे.
सी. पी. राधाकृष्णन यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते, त्यात माजी उपराष्ट्रपती वेंकैय्या नायडू, माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, तसेच जगदीप धनखड हे स्वतः उपस्थित होते. धनखड यांना राधाकृष्णन यांच्याआधी उपराष्ट्रपतीपद भूषवले होते, आणि शपथविधीप्रसंगी ते वेंकैय्या नायडू यांच्या शेजारी बसलेले दिसले. एनडीएच्या सूत्रांनुसार, मुहूर्त पाहून शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सी. पी. राधाकृष्णन हे भारताचे 15वे उपराष्ट्रपती झाले आहेत. 9 सप्टेंबरला झालेल्या निवडणुकीत त्यांना एकूण 452 मते मिळाली, तर विरोधकांचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना फक्त 300 मते मिळाली.उपराष्ट्रपती होण्यापूर्वी सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल होते.याशिवाय ते तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील राहिले आहेत.