जालना, 11 ऑगस्ट –
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महायुती सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांनी तत्काळ राजीनामे द्यावेत, या मागणीसाठी शहरातील महात्मा गांधी चमन येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाच्या ठिकाणी “माझ्या राज्याचा मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकतो, विधीमंडळात रमी खेळतो, अघोरी जादूटोणा करतो, डान्स बार चालवतो, नोटांच्या बॅगा घेऊन बसतो” अशा घोषणांचे बॅनर लावण्यात आले होते.
तसेच “अशीही बनवाबनवी” नावाच्या चित्रपटाचे पोस्टरही लावण्यात आले होते. या पोस्टरमध्ये संजय नोटा वाले, रम्मीराव ढेकळे, योगेश डान्सबार वाले, गुलाबी महाजन आणि अघोरी जादू वाले अशा भूमिकांचा उल्लेख होता. चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक आणि संवाद लेखक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची स्केचेस दाखवण्यात आली होती.