जालना, १० जून, (हिं.स.) : जालना जिल्ह्यातील वरुड गावात वटपौर्णिमेच्या दिवशी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात काम करत असताना तुटलेल्या विद्युत वायरचा स्पर्श झाल्याने वडील आणि त्यांची दोन चिमुकली मुले यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम मस्के हे आपल्या शेतात मल्चिंग पेपर अंथरण्याचे काम करत होते. त्याच दरम्यान, शेतातून गेलेल्या विद्युत वाहिनीतील एक वायर तुटलेली होती आणि ती त्यांच्या शरीरास स्पर्श झाली. यामुळे त्यांना जोरदार विद्युत झटका बसून ते जमिनीवर कोसळले.
हे पाहून त्यांची मुले, श्रद्धा मस्के आणि समर्थ मस्के, धावत जाऊन वडिलांना उठवण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, वडिलांच्या शरीरात अद्याप विद्युत प्रवाह असल्याने दोघांनाही तीव्र झटका बसला होता.
घटना घडताना विनोद मस्के यांच्या पत्नीने हा भयावह प्रसंग डोळ्यांसमोर पाहिला. त्यांनी जोरजोराने आरडाओरड केली. आवाज ऐकून आजू बाजूचे शेतकरी घटनास्थळी धावले आणि तत्काळ वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर तिघांनाही तातडीने जालन्यातील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केले.
वटपौर्णिमेसारख्या सणाच्या दिवशी घडलेल्या या अपघातामुळे वरुड गावात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरावर शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांनी या दुर्घटनेनंतर शेतातून जाणाऱ्या विद्युत वाहिन्यांची तपासणी करावी, अशी मागणी वीज वितरण कंपनीकडे केली आहे.