जम्मू-काश्मीर, 30 जुलै – पूंछ जिल्ह्यातील कसालियन भागात मंगळवारी रात्री सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले. हे दहशतवादी रात्री उशिरा सीमोलंघन करून भारतीय हद्दीत घुसले होते. लष्कर-ए-तोयबा गेल्या काही काळात पहलगाम व इतर भागांत घुसखोरीच्या घटना वाढवत असल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे.
सुरक्षा दलांनी वेळीच प्रत्युत्तर दिले आणि मोठ्या शौर्याने कारवाई केली. अद्याप ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.
दहशतवादविरोधी ऑपरेशनची तीव्रता वाढली
अलीकडच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरुद्धची मोहिम अधिक तीव्र करण्यात आली आहे. फक्त दोन दिवसांपूर्वी, ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मुख्य सूत्रधाराला ठार करण्यात आले. हे ऑपरेशन श्रीनगरजवळील दाचीगाम जंगलात राबवण्यात आले होते.
सुरक्षा यंत्रणांना या कारवाईदरम्यान पाकिस्तानप्रेरित कटाचे पुरावेही मिळाले आहेत.
हाशिम मुसा – पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड
ठार करण्यात आलेला प्रमुख दहशतवादी हाशिम मुसा याने पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपमध्ये ‘पॅरा कमांडो’ म्हणून प्रशिक्षण घेतले होते. नंतर तो लष्कर-ए-तोयबात सामील झाला. सप्टेंबर २०२३ मध्ये तो भारतात परतला आणि दक्षिण काश्मीरमध्ये आपली दहशतवादी कारवाई पुन्हा सुरू केली.
सुरक्षा यंत्रणांनी वेळेत केलेल्या कठोर आणि प्रभावी कारवाईमुळे संभाव्य मोठा धोका टाळला गेला आहे.