श्रीनगर, 28 जुलै – श्रीनगरमधील हरवन परिसरात सोमवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान मुलनारच्या जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करताना दोघांना ठार करण्यात आले आहे.
सैन्य सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरवनमधील लिडवास भागात ही चकमक सुरू झाली. सुरक्षा दल, पोलिस आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाने महादेवजवळील मुलनारच्या जंगलात संशयित दहशतवाद्यांचा वेढा घातला. या पथकाने संशयित ठिकाणी पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्याला प्रत्युत्तर देत सुरक्षा दलांनी कारवाई सुरू ठेवली.
दोन ते तीन दहशतवादी या भागात लपल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून संपूर्ण परिसर सील करून मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या दहशतवाद्यांचा संबंध बंदी घालण्यात आलेल्या लष्कर-ए-तैयबा (LeT) या संघटनेशी असल्याची शक्यता आहे. ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतरच अधिकृत तपशील देण्यात येईल, असे लष्कराकडून सांगण्यात आले.