छत्रपती संभाजीनगर, 5 सप्टेंबर – ओबीसी समाजात वाटेकरी वाढत चालले असल्याचे ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. मात्र, आम्ही त्यांच्यात नाही तर ते आमच्यात आले आहोत. मराठा समाज 1881 पासून आतापर्यंत आरक्षणात होता. मात्र, छगन भुजबळ 1989 मध्ये आरक्षणात आले आहेत. आम्ही पूर्वीपासून आरक्षणात होतो. आमच्या लेकरा बाळांना उंचीवर न्यायचे असेल, समाजाला पुढे न्यायचे असेल तर आम्हाला आरक्षण घ्यावे लागणार आहे. हे आमच्या आता लक्षात आले असल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा समाजाची ओबीसी समाजात घुसखोरी म्हणता येणार नाही. याला अधिकृत प्रवेश म्हणता येईल. आता मराठा समाज अधिकृतपणे ओबीसी समाजात गेला आहे. येवल्यातील माणसाचा बोलण्याचा रोख वेगळा आहे. अशा शब्दात जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पलटवार केला आहे.
वास्तविक मराठे हे सरसकट आरक्षणात गेले आहेत. मात्र आता आपल्या समाजातील लोकांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे. करोडोच्या संख्येने मराठा समाजातील लेकर मुंबईला गेले. त्यामुळे विजय घेऊन परत आले असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे.
राज्य सरकारच्या वतीने जीआर काढण्यात आला आहे. ओबीसीत मराठा समाजाला घालण्यासाठी हा जीआर पारित करण्यात आला आहे. आता केवळ अंमलबजावणी बाकी आहे. वास्तविक सर्व मराठा समाज ओबीसीमध्ये गेला असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार विलास भुमरे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात भेट घेतली. या वेळी पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील यांनी भुजबळांवर पुन्हा एकदा निशाणा साधला.