तेहरान , 10 जुलै (हिं.स.)।गेल्या महिन्यात इस्राइल आणि इराण यांच्यात पेटलेला संघर्ष कसाबसा थांबला होता. यादरम्यान, अमेरिकेने इराणमधील अणुकेंद्रांवर बी-२ बॉम्बर्स या शक्तिशाली विमानांच्या माध्यमातून हल्ला करून ती नष्ट केली होती.त्यानंतर आता या भागातील वातावरण काहीसं शांत होत असतानाच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे सल्लागार जवाद लारीजानी यांनी एका मुलाखतीत ट्रम्प यांना धमकी दिली आहे, त्यांनी म्हणलं की, डोनाल्ड ट्रम्प हे आता त्यांच्या फ्लोरिडामधील निवासस्थानामध्येही सुरक्षित नाही आहेत.
इराणमध्ये एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत लारीजानी म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी काही अशी कामं केली आहेत, ज्यामुळे आता ते फ्लोरिडामधील आपल्या निवासस्थानी मोकळेपणाने सनबाथसुद्धा घेऊ शकत नाहीत. जेव्हा ते अंग शेकत उन्हात पडलेले असतील तेव्हा एक छोटंसं ड्रोन येऊन त्यांच्या बेंबीवर निशाणा साधू शकतं. हे काम खूप सोपं आहे. उन्हात पडलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर एका छोट्या ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करणं सहजसोपं आहे, असा दावाही त्यांनी केला.
आता लारीजानी यांनी दिलेल्या या धमकीकडे जानेवारी २०२० मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात इराणमधील कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं जात आहे. सुलेमानी हे इराकच्या दौऱ्यावर असताना त्यांची हत्या करण्यात आली होती. तसेच या हत्येसाठी इराणकडून डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार ठरवण्यात आलं होतं.
इराणकडून या धमकीसोबतच एक वागदग्रस्त ऑनलाइन मोहीमही चालवती जात आहे. त्याचं नाव ब्लड पॅक्ट असं आहे. या माध्यमातून इराण सरकार आणि खामेनेई यांचे शत्रू असलेल्या व्यक्तींविरोधात बदल्याची कारवाई करण्यासाठी निधी गोळा केला जात आहे. दरम्यान, सुलेमानी यांची हत्या झाल्यापासून इराणमधील रिव्होल्युशनरी गार्ड डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचत असल्याची माहिती अमेरिकेला मिळत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेबाबत विशेष काळजी घेतली जात आहे.