खास प्रतिनिधी
सोलापूर : राज्याचे ग्रामविकास आणि सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या सिंहासनावर विराजमान झाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैंठक गाजवून प्रशासनामध्ये हवा निर्माण केलेले पालकमंत्री जयकुमार गोरे बर्याच दिवसानंतर सोलापूर जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौर्यावर आले. त्यांच्या या दोन दिवसांच्या दौर्यात खूप काही शिजलं अन् शिजवलं गेलंसुद्धा. सांगोल्यातील नागरी सत्काराचा सोहळा उरकून नामदार गोरे हे त्यांच्या सुसाट ताफ्यासह माण तालुक्यातील त्यांच्या बोराटवाडीत पोचले खरे, पण त्यांच्या दौर्याच्या निमित्त्ताने सोलापूर जिल्ह्यात चर्चेची उठलेला धुराळा मात्र अद्याप खाली बसताना दिसत नाही.
विशेषत्वे,उत्तर आणि दक्षिण सोलापूरसह अक्कलकोट या तीन तालुक्यांच्या राजकीय दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमुळे तापलेली राजकीय हवा आणि डीसीसी बँकेच्या वसूलीसंदर्भात जिल्ह्यात काही राजकारण्यांवरील कारवाईची टांगती तलवार हे दोन विषय पालकमंत्र्यांच्या दौर्याच्या केंद्रस्थानी आले.त्यातूनच त्यांच्या या दौर्याला आणि पुढे चर्चेच्या उठलेल्या धुराळ्याला महत्त्व आले.
सोपल, पाटील अन् काळुंगेंच्या उपस्थितीवरुन तर्क-वितर्क
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या घरी स्नेहभोजनाला हजेरी लावून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मैत्रीचा धर्म निभावला खरा मात्र या ‘डिनर डिप्लोमासी’ची खमंग चर्चा सोलापुरात सध्या सुरू आहे. माने यांच्याकडील ‘डिनर डिप्लोमासी’ला माजी आमदार राजन पाटील तसेच आमदार दिलीप सोपल आणि मंगळवेढ्याचे नेते शिवाजी काळुंगे हे नेमक्या होते स्नेहभोजनाच्या आस्वादाला आले कसे? स्नेहभोजनावेळी झालेल्या चर्चेचा तपशील मात्र बाहेर येऊ दिला नाही.यावरुनच वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
खंगम चर्चेच्या तोंडी लावण्याला बाजार समितीचा विषय
सोलापूरच्या दौर्यावर असलेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलीप माने यांच्या होटगी रोडवरील ‘सुमित्रा’ या निवासस्थानी स्नेहभोजन घेतले. तत्पूर्वी सकाळीच शासकीय विश्रामगृहात जाऊन माजी आमदार माने यांनी पालकमंत्री गोरे यांची भेट घेतली होती. सकाळी शासकीय विश्रामगृहात बंद दाराआड चर्चा आणि त्यानंतर दुपारी भोजन हे सगळं दिलीप माने आणि मंत्रि गोरे या दोघांमध्ये घडलं. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या लागलेल्या निवडणुकीचा संदर्भ या दोघांची भेट, चर्चा आणि स्नेहभोजन यासंबंधी लावला जात आहे.जिल्ह्यात मंत्रि गोरे यांच्या माने यांच्या निवासस्थानी जे स्नेहभोजन झाले, त्याची जी खमंग चर्चा रंगली आहे, त्या चर्चेच्या तोंडी लावण्याला बाजार समिती हा विषय आहे.
नामदार गोरेंनी केलेला ‘तो’ खुलासा अन्…
भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मंत्रि जयकुमार गोरे यांनी माने यांच्याकडील जेवणाबाबत स्पष्टीकरण दिले होते. ‘मी कोणाकडेही जेवायला गेलो, तरी अगोदर भाजपा कार्यकर्त्याच्या काम होईल. सुभाषबापू मी सोलापूर जिल्ह्यात व्यक्तिगत राजकारण करायला आलो नाही. आपण माझ्यापेक्षा पक्षात आणि संघटनेतही खूप ज्येष्ठ आहात, काही चिंता करू नका, मी पक्षासाठीच काम करणार आहे’ असा खुलासा गोरे यांनी केला होता. त्यावरदेखील चर्चेचं धुमशान सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती वर्तुळासह, भाजप, आमदार सुभाष देशमुख आणि माजी आमदार दिलीप माने यांच्या समर्थकांमध्ये आहे.
अगोदर भोजनासाठी पदार्थ रटारटा शिजले,
पुन्हा स्नेहभोजनावेळी ‘सोशल इंजिनिअरिंग’चं शिजलं राजकारण
मेळाव्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी दिलीप माने यांच्या निवासस्थानी जाऊन स्नेहभोजनाचा आनंद घेतला. गोरे येण्यापूर्वी त्या ठिकाणी बार्शीचे आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजन पाटील, शिवाजीराव काळुंगे उपस्थित होते. गोरे आल्यानंतर निवेदन देण्यासाठी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण ढोबळे हेही त्या ठिकाणी आले, त्यानंतर या सर्व नेत्यांची डिनर डिप्लोमसी रंगली. एकाच टेबलावर बसून जेवण करणार्या या नेत्यांची चांगलीच चर्चा रंगली हेाती. मंत्रि गोरेंच्या शाही भोजनासाठी दिलीप माने यांच्य सुमित्रा या निवासस्थानी अनेक पदार्थ रटारटा शिजले. त्यानंतर प्रत्यक्ष स्नेहभोजनावेळी सोशल इंजिनिअरगिंचं राजकारण शिजल्याची चर्चा मात्र सुरु झाली आहे.
बाजार समितीच्या निवडणूक निर्णयाची भेंडी फुटलीच नाही
मंत्रि जयकुमार गोरेंच्या या दौर्यात सोलापूर बाजार समिती निवडणुकीचा विषय अजेंड्यावर घेतला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले गोरे हे या बाजार समितीच्या निवडणुकीसंबंधी फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार, धोरणात्मक निर्णय घेतील, फडणवीसांचे दुसरे विश्वासू शिलेदार आमदार सचिन कल्याशेट्टी हेदेखील या निवडणुकीसंबंधी गोरेंच्या कानात काही सांगतील. त्यावर निवडणुकीची भेंडी फुटेल असे अपेक्षित होते. मात्र अद्याप भेंडी फुटलेली नाही.
‘सॉफ्ट कॉर्नर’साठी धडपड?
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नुकसानीची वसुली सुरू आहे, त्याप्रकरणी माजी अध्यक्ष आणि संचालकांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. बँकेच्या नुकसानाची वसुली अधिकारी आणि संचालकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान वसूली आणि कारवाई यासंबंधी सॉफ्ट कॉर्नर मिळावा, या पार्श्वभूमीवर, माजी आमदार दिलीप माने, राजन पाटील यांनी मंत्रि गोरेंची भेट घेण्याची धडपड केली असावी, असाही अंदाज लावला जात आहे.
फोटो ओळ
सोलापूर : होटगी रस्त्यावरील ‘सुमित्रा’ या दिलीप माने यांच्या निवासस्थानी मंत्रि जयकुमार गोरे यांच्यासह जिल्ह्यातील काही नेतेमंडळींनी एकत्रित भोजनाचा आस्वाद घेतला, यावेळी काय चर्चा झाली असावी, याच्या तर्क-वितर्कवरुन सोलापूर जिल्ह्यात चर्चेचं वादळ उठलंय.