नाशिक, 21 मार्च (हिं.स.)
देवदर्शनासाठी नाशिक येथे आलेल्या आंध्र प्रदेशमधील महिला भाविकाचे ८ तोळ्यांचे सोन्याचे दागिने मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्याने चोरून नेल्याची घटना रामकुंड परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी लक्ष्मीसुजाता तांडवाकृष्णमुर्ती माटुरू (६५, रा. भट्टीपोलू, ता. रॅपला, आंध्र प्रदेश) ही महिला नातेवाईकांसमवेत देवदर्शनासाठी आली होती. ही महिला व तिचा मुलगा नारोशंकराच्या मंदिरात दर्शनासाठी जात होते. त्यावेळी नारोशंकर मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर रामकुंडाच्या दिशेने फिर्यादी महिलेच्या समोर अचानक एक मोटारसायकल आली.
त्या मोटारसायकलीवर पाठिमागे बसलेल्या इसमाने महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किंमतीची १६ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, ५० हजार रुपये किंमतीची १६ ग्रॅम वनजाचे लाल रंगाचे खडे असलेली सोन्याची चेन व ४८ ग्रॅम वजनाची ९० हजार रुपये किंमतीची दोन पदरी सोन्याची चेन अशा एकूण १ लाख ९० हजार रुपये किंमतीच्या ३ चैन बळजबरीने खेचून गौरी पटांगणाच्या दिशेने भरधाव मोटारसायकलीने पळून गेले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळकर करीत आहे.