१० लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांविरुद्ध सुरू होती कारवाई
रांची, ४ सप्टेंबर : झारखंडच्या पलामू जिल्ह्यात पोलिस दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यात दोन जवान शहीद झाले असून एक जवान जखमी झाला आहे. शहीद जवानांमध्ये संतन कुमार मेहता आणि सुनील राम यांचा समावेश आहे, तर जखमी जवानाचे नाव रोहित कुमार असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.
डीआयजी नौशाद आलम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, या भागात कर्म पूजा आयोजित केली जात आहे आणि याच दरम्यान नक्षलवादी दहशत माजवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्याआधारे एसपींच्या नेतृत्वाखालील पोलिस दल दोन पथकांमध्ये विभागून शोधमोहीम सुरू करण्यात आली. या दरम्यान जवान डोंगरी मार्गावरून पुढे जात असतानाच लपलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही तत्काळ प्रत्युत्तर दिले. मात्र या चकमकीत संतन कुमार मेहता आणि सुनील राम शौर्याने लढत शहीद झाले, तर रोहित कुमार गंभीर जखमी झाला. हे तिघेही यापूर्वी टायगर मोबाईलमध्ये कार्यरत होते.
महत्वाचे म्हणजे या नक्षलवाद्यांवर १० लाख रुपयांचे बक्षीस होते. यात टीएसपीसी कमांडरचाही समावेश आहे.
गोळीबारात नक्षलवाद्यांचेही बळी गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप कोणताही मृतदेह सापडलेला नाही. चकमकीनंतर परिसराला वेढा घालून कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पलामू जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व परिस्थितीचा आढावा घेतला. शहीद जवानांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण पलामू जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली असून नक्षलवाद्यांविरुद्धची कारवाई आणखी तीव्र करण्यात येईल आणि जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे आश्वासन देण्यात आले आहे.