चायबासा, 07 सप्टेंबर : झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील गोइलकेरा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आराहासा परिसरातील रेला गावानजीक असलेल्या बुरजूवा डोंगर परिसरात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. या चकमकीत नक्षलवाद्यांचा झोनल कमांडर अमित हांसदा ऊर्फ अपटन ठार झाल्याची माहिती मिळत आहे. त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते.
यासंदर्भातील माहितीनुसार चायबासाचे जिल्हा पोलीस अधीक्षक (एसपी) राकेश रंजन यांना गुप्त माहिती मिळाली होती की, रेला पराळ परिसरात माओवादी नक्षलवादी सक्रिय आहेत. यानंतर, पोलीस व सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने त्या भागात शोधमोहीम सुरू केली. शोध मोहीमेदरम्यान नक्षलवाद्यांनी अचानक पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांकडूनही प्रत्युत्तरात गोळीबार करण्यात आला. संपूर्ण डोंगराळ परिसराला सुरक्षादलांनी घेरले असून नक्षलवाद्यांचे पळवाटे बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एसपी राकेश रंजन या संपूर्ण कारवाईवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. परिसरात अतिरिक्त पोलिस दलही तैनात करण्यात आले आहे.