मुंबई, 22 एप्रिल (हिं.स.)। भारतातील खाजगी क्षेत्रातील आघाडीची वीज उत्पादक कंपनी आणि 24 अब्ज डॉलरच्या JSW समूहाचा भाग असलेल्या JSW एनर्जी लिमिटेडने पश्चिम बंगालमधील सालबोनी येथे अत्याधुनिक 1600 मेगावॅट (2×800 मेगावॅट) अल्ट्रा सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्लांटच्या उभारणीस सुरुवात केली आहे.
या भूमिपूजन सोहळ्याला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री श्रीमती ममता बॅनर्जी, JSW समूहाचे अध्यक्ष श्री. सज्जन जिंदाल, JSW फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती संगीता जिंदाल, JSW समूहाचे श्री. पार्थ जिंदाल तसेच शासनातील अन्य मान्यवर उपस्थित होते.
हा 16,000 कोटी रु. चा प्रकल्प कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा ग्रीनफिल्ड प्रकल्प आहे. हा प्रकल्प 25 वर्षांच्या पॉवर परचेस अॅग्रीमेंट (PPA) अंतर्गत पश्चिम बंगाल स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड (WBSEDCL) सोबत जोडलेला आहे. हा प्रकल्प पश्चिम बंगालला SHAKTI B (IV) धोरणांतर्गत वाटप करण्यात आलेल्या देशांतर्गत कोळशाचा वापर करेल. त्यामुळे ऊर्जा सुरक्षिततेला चालना मिळेल आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला हातभार लागेल.
धोरणात्मक महत्त्व आणि आर्थिक प्रभाव
सालबोनी प्रकल्प हा JSW एनर्जीच्या पूर्व भारतातील विस्तार धोरणाचा एक मुख्य भाग आहे. या प्रकल्पामुळे प्रदेशातील औद्योगिक पायाभूत सुविधा बळकट होतील तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या प्रकल्पातून हजारो थेट व अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा असून, कौशल्यविकास व स्थानिक स्त्रोतांचा वापर करून सालबोनी आणि परिसराचा सर्वांगीण विकास करण्यात येईल.
JSW समूहाचे अध्यक्ष श्री. सज्जन जिंदाल म्हणाले: “सालबोनीमध्ये पुन्हा एकदा परत येणे नेहमीच आनंददायक असते. याच ठिकाणाहून पश्चिम बंगालमधील आमचा प्रवास सुरू झाला. मा. मुख्यमंत्री ममता दीदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाशिवाय आणि राज्य सरकारच्या मोलाच्या मार्गदर्शन व पाठबळाविना ही यात्रा शक्य झाली नसती. त्यांचे बंगालसाठीचे दूरदृष्टीपूर्ण विचार आणि इथल्या जनतेवरील विश्वास आम्हाला या राज्यात गुंतवणूक करण्यासाठी सतत प्रेरित करतात.
“JSW Energy चा आगामी 1600 मेगावॅट क्षमतेचा अल्ट्रा सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट हा आमच्या समूहाचा सर्वात मोठा ग्रीनफिल्ड प्रकल्प आहे आणि पश्चिम बंगालमधील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठा थर्मल पॉवर प्रकल्प आहे. आम्ही या प्रकल्पात 16,000 कोटी रु. ची गुंतवणूक करणार असून यामुळे 2000 हून अधिक थेट व अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील. आम्ही इथे सालबोनीमध्ये 2000 एकरवर पसरलेला JSW इंडस्ट्रियल पार्कही उभारत असून तो प्लग-अँड-प्ले इन्फ्रास्ट्रक्चरसह आधुनिक शहरी नियोजन तत्वांवर आधारित असेल. हा औद्योगिक पार्क राज्यातील आणि देशाच्या पूर्व भागातील औद्योगिक व आर्थिक विकासासाठी दूरगामी परिणाम करणारा गेम चेंजर ठरेल.”
शाश्वततेबाबत बांधिलकी
JSW Energy नेहमीच शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनीला सलग तीन वर्षे CDP क्लायमेट चेंजमध्ये ‘लीडरशिप बँड (A-)’ हा दर्जा मिळाला असून भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील हे सर्वोच्च मानांकन आहे. कंपनी हरित हायड्रोजन आणि ऊर्जा साठवण उपाययोजनांमध्येही गुंतवणूक करत आहे. त्यायोगे देशासाठी विश्वसनीय व परवडणारी ऊर्जा उपलब्ध होईल.
पुढील दिशा
विविध प्रकल्प अधिग्रहण करून आणि 30 GW पेक्षा जास्त लॉक-इन क्षमता प्राप्त करून घेत कंपनीने 2030 पूर्वीच 20 GW वीज उत्पादन क्षमतेचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. कंपनीला जून 2025 पर्यंत 14 GW इंस्टॉल्ड कॅपेसिटी गाठण्याची अपेक्षा आहे. JSW Energy कडे ऊर्जा साठवण क्षेत्रात एकूण 16.3 GWh चे प्रकल्प आहेत. त्यामध्ये 12 GWh क्षमतेचा भारतातील सर्वात मोठ्या पंप्ड हायड्रो स्टोरेज प्रकल्पांपैकी एक प्रकल्प समाविष्ट आहे. कंपनी 2030 पर्यंत 40 GWh ऊर्जा साठवण क्षमता गाठण्याचे लक्ष्य ठेवून आहे.