मुंबई, 8 जुलै, (हिं.स.)। सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी भूषण गवई यांची नियुक्ती होणे म्हणजे भारतीय लोकशाहीतील सामाजिक समतेचा आणि सर्वसमावेशकतेचा विजय आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसलेले सरन्यायाधीश भूषण गवई हे महाराष्ट्राचे सुपूत्रच नाहीत तर महाराष्ट्राचे भूषण देशाच्या न्यायप्रणालीचे शिरोमणी ठरलेले आहेत. त्यांच्या अनेक निर्णयांमधून मानवता, संवेदनशीलता आणि संविधानिक मूल्यांची प्रतिष्ठा उंचावण्याचे काम केले. सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांना त्यांनी न्याय, हक्क मिळवून दिला. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी माणुसकीचे तत्व कायम जपले. केवळ न्यायमूर्ती म्हणून नव्हे तर, एक आदर्श नागरिक, कठोर परिश्रमी विद्यार्थी, आणि एक संवेदनशील माणूस म्हणूनही त्यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे.
न्यायदान करताना त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय दिले असून त्यांची भाषा सौम्य असली तरी निर्णय ठाम असतात आणि म्हणून त्यांचे कर्तृत्व दीपस्तंभासारखे आहे, असेही ते म्हणाले.सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्काराला दोन बाजू आहेत. एका बाजूला लोकशाहीचा एका स्तंभाने, लोकशाहीच्या दुसऱ्या स्तंभाचे सर्वोच्चपदी विराजमान झालेल्या व्यक्तींचा हा सत्कार आहे, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील सभागृहांच्या जनतेने प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेल्या सभागृहांतील आपल्या माणसांकडून, कुटुंबातील आपल्याच एका माणसाचा आपलेपणाने, कौतुकाने केलेला हा गौरव आहे.
