मुंबई, 30 जुलै – अहमदनगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील (अहिल्यानगर तालुका) येथील कौसाबाई मारुती सरोदे यांच्या नावावरील ५१ गुंठे जमीन बेकायदेशीरपणे दुसऱ्याच्या नावे फेरफार झाल्याप्रकरणी तब्बल १२ वर्षांनी सरोदे कुटुंबाला अखेर न्याय मिळाला आहे.
दरम्यान, तलाठी, तहसील आणि प्रांत कार्यालयांच्या अनेक फेऱ्यांनंतरही न्याय मिळत नसल्याने, गेल्या महिन्यात सरोदे कुटुंबीयांनी ग्रामपंचायत सरपंच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात शेळ्या-मेंढ्यांसह ९ दिवसांचे बेमुदत आंदोलन छेडले होते. या अनोख्या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले.
युवानेते पांडुरंग दातीर यांनी हे प्रकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर योगेश कदम यांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना तातडीने चौकशी करून कारवाईचे निर्देश दिले.
गृह राज्यमंत्री कदम यांच्या तत्परतेमुळे तहसील प्रशासनाने सरोदे कुटुंबाच्या बाजूने फेरफार आदेश काढला आणि त्यांच्या जमिनीची नोंद पुन्हा त्यांच्या नावे करण्यात आली. यानंतर कुटुंबीयांनी आंदोलन मागे घेतले.
आज कौसाबाई सरोदे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन घोंगडी, पिवळा फेटा आणि भंडारा देऊन त्यांचा सन्मान केला. या वेळी सरपंच शरद पवार, सूर्यभान सरोदे, चंद्रकांत पवार, अभिषेक कदम, युवराज हजारे आणि किरण मोरे उपस्थित होते.
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एक स्थानिक नेते म्हणाले,
“जेव्हा प्रशासन सजग असतं आणि नेतृत्व जनतेप्रती संवेदनशील असतं, तेव्हा कितीही जुना अन्याय असो, शेवटी न्याय मिळवून देणे शक्य होतं.”
ही घटना शासनाच्या कार्यक्षमतेचे आणि उपमुख्यमंत्री शिंदे व मंत्री योगेश कदम यांच्या जनसामान्यांप्रती असलेल्या बांधिलकीचे उदाहरण ठरली आहे.