अमरावती, 8 जुलै (हिं.स.)प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १३८ किलोमीटरची पदयात्रा सुरू झाली आहे. देशाचे माजी कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या पापळ येथून सुरू झालेली ही पदयात्रा यवतमाळ जिल्ह्याकडे सरकत आहे. वाटेत सुकळी येथे शेतकऱ्यांनी शेतात चक्क भाजपचे झेंडे रोवून लक्ष वेधून घेतले आहे.
सुकळी येथील शेतकऱ्यांनी शेतात भाजपचे झेंडे लावून सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला असतानाच शेतात लावलेले फलक देखील लक्ष वेधून घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे, अजित पवार हे बैलगाडीवर बसल्याचे छायाचित्र या फलकावर आहे. आता पेरणी करणे बंद, गोरगरीब लोकांच्या जीवावर उठलेले म्होरके, आता एकतर गांजा, अफूचे पीक, नाहीतर पक्षाचे झेंडे, असा उल्लेख या फलकावर आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन सरकारनेच दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी लाडकी बहीण योजना आणली त्यावेळी कोणती समिती गठीत केली काय? मग शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी समिती कशाला तयार करत आहेत, थेट घोषणाच केली पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली.
