सोलापूर, 28 एप्रिल (हिं.स.)।
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे यांच्या नेतृत्वाखालील सिध्देश्वर शेतकरी विकास पॅनेलने १८ पैकी १४ जागांवर विजय प्राप्त करून सत्ता अबाधित ठेवली. तर, आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख यांच्या गटाला धक्का बसला आहे. त्यांना केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.
सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आप्पासाहेब काडादी मंगल कार्यालयात सुरूवात झाली. सुरूवातीला ग्रामपंचायत गटातून आ. सुभाष देशमुख याच्या श्री सिध्देश्वर शेतकरी परिवर्तन पॅनेलमधील मनिष देशमुख, रामाप्पा चिवडशेट्टी, अतुल गायकवाड हे तिघे विजयी झाले. तर, ग्रामपंचायतीच्या आर्थिक दुर्बल घटकातून कल्याणशेट्टी पॅनेलचे सुनील कळके विजयी झाले. त्यानंतर हमाल-तोलार गटातून दिलीप माने यांचे समर्थक गफार चांदा विजयी झाले. व्यापारी गटातून मुश्ताक चौधरी व वैभव बरबडे विजयी झाले असून चौधरी हे दिलीप माने समर्थक तर बरबडे हे विजयकुमार देशमुख गटाचे समर्थक असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सर्वाधिक जागा असलेल्या सोसायटी (सहकारी संस्था) गटाची मतमाेजणी सुरू झाली. त्या सर्व ११ जागांवर कल्याणशेट्टी पॅनेलचे सर्व उमेदवार जवळपास ८०० मतांच्या फरकाने विजयी झाले.
सोसायटीतून माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, श्रीशैल नरोळे, प्रथमेश पाटील, उदय पाटील, नागण्णा बनसाेडे, इंदुमती अलगोंडा-पाटील, अनिता विभुते, अविनाश मार्तंडे, सुभाष पाटोळे हे विजयी झाले आहेत. यामुळे या निवडणुकीत १४ विरूध्द ४ अशा फरकाने कल्याणशेट्टी-माने-हसापुरे पॅनेलने वर्चस्व सिध्द केले आहे.
दरम्यान, मतमोजणीनंतर कल्याणशेट्टी-माने-हसापुरे गटाने जल्लोष केला. तर, ग्रामपंचायत गटातून तीन जागांवर विजय प्राप्त झाल्यानंतर सुभाष देशमुख गटानेही जल्लोष केला.