मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत प्रकरणात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लक्ष घातले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगना रनौत प्रकरणाची अयोग्य पद्धतीने हाताळणी केली, अशा शब्दात भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजॉय मेहता यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयाच्या बांधकामाचा भाग पाडण्यात दाखवलेली घाईवर राज्यपालांना नापसंती दर्शवली आहे. त्यामुळे अजॉय मेहता यांना राजभवनात बोलावून घेतले. कोश्यारी या वादाबाबत केंद्र सरकारकडे अहवाल देण्याची शक्यता आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* हे शीतयुद्ध नवीन नाही
कंगना रनौतची वक्तव्ये आणि बंगला पाडल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजॉय मेहता यांना बोलावले. “कंगनाने राज्य सरकारविरोधात वक्तव्य केल्यानंतर एका दिवसात तिचे कार्यालय पाडण्यात आले. याविषयी राज्यपाल नाराज आहेत. त्यांनी आपल्या भावना उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यास मेहता यांना सांगितले” अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील शीतयुद्ध नवीन नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषद आमदारकीपासून राज्यपाल नियुक्त आमदार आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा अशा अनेक विषयांवर उभय पक्षांमध्ये मतभेद आहेत.
* कंगनाची राजकीय खेळी
“सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची वेळ आली आहे. तुम्ही सहमत आहात का?”, असं ट्विट करुन कंगनाने कालच राजकीय खेळी खेळायला सुरुवात केली होती.
कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयावर काल महापालिकेचा हातोडा पडला. या पार्श्वभूमीवर कंगनाने आधी आपल्या ऑफिसला राम मंदिराची उपमा देत बीएमसीची तुलना बाबराशी केली, नंतर तिने थेट पाकिस्तान असे लिहित लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात केला होता. कंगनाच्या याचिकेनंतर हायकोर्टाने पाडकामाला स्थगिती देण्याचे आदेश दिले. तसेच पालिकेला आपले म्हणणे मांडण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेनेही जितका भाग अनधिकृत आहे तेवढे पाडल्याचे सांगत आता पाडकाम करणार नसल्याचे वृत्त आहे.