देहरादून, 12 ऑगस्ट – उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने केदारनाथ धाम यात्रा 14 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) 12, 13 आणि 14 ऑगस्ट रोजी रुद्रप्रयाग, हरिद्वार, डेहराडून, टिहरी, पौडी, नैनिताल यांसह अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर असून यात्रेकरू आणि स्थानिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
रुद्रप्रयागचे जिल्हाधिकारी प्रतीक जैन यांनी सांगितले की, रेड व ऑरेंज अलर्ट असलेल्या भागांत प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनी जलस्रोतांच्या जवळील जागा सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. नदीच्या पाण्याची पातळी सतत तपासली जात असून पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
दरम्यान, सोमवारी देहरादूनमध्ये नद्या व नाले तुंबून वाहू लागले, रस्त्यांवर पाणी साचले आणि मालदेवता परिसरातील काही घरे नदीने उद्ध्वस्त केली. टिहरी गढवालच्या मंदर गावात सरकारी शाळेच्या प्रसाधनगृहाचा भाग कोसळला. उत्तरकाशीमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने अतिरिक्त सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशात सलग नऊ दिवसांच्या पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. लखनौमध्ये विधानभवन परिसरासह मुख्यमंत्री निवासाजवळील रस्त्यांवर दोन फूट पाणी साचले. गोरखपूरमध्ये जिल्हा रुग्णालय व सीएमओ कार्यालयात पाणी घुसले. बिजनौरच्या गुला नदीत एक कार वाहून गेली, तर सहारनपूरमध्ये पूरात शाळेची व्हॅन अडकली असून ग्रामस्थांनी मुलांना सुरक्षित बाहेर काढले.
हवामान विभागाने मंगळवारी उत्तराखंड आणि आसामसह सहा जिल्ह्यांसाठी रेड, हिमाचल व बिहारसह तीन जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशसह 16 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. प्रतिकूल हवामान लक्षात घेता पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहावे, असे प्रशासनाचे आवाहन आहे.