नैरोबी, 8 ऑगस्ट – अमरेफ हेल्थ आफ्रिका संस्थेच्या वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान गुरुवारी (7 ऑगस्ट) नैरोबीजवळील वीहोको भागातील नागरी वस्तीत कोसळले. या भीषण दुर्घटनेत दोन डॉक्टर, दोन परिचारिका आणि दोन स्थानिक नागरिकांसह एकूण ६ जणांचा मृत्यू झाला असून, काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
माहितीनुसार, वैद्यकीय पथक सोमालीलँडला रवाना होत असताना विमानाने नैरोबीवरून उड्डाण केले. मात्र, काही क्षणांतच ते नियंत्रण सुटून नागरी वस्तीत कोसळले.
किआम्बू काऊंटीचे आयुक्त हेनरी वफुला यांनी सांगितले की, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये दोन डॉक्टर, दोन परिचारिका आणि दोन स्थानिक रहिवाशांचा समावेश आहे.
अमरेफ हेल्थ आफ्रिका ही आफ्रिकन देशांमध्ये आरोग्य सेवा पुरवणारी प्रमुख अशासकीय संस्था आहे. अपघातानंतर संस्थेने आपत्कालीन मदत पथके घटनास्थळी पाठवली असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.