ओटावा / मुंबई, 11 जुलै (हिं.स.)। विनोदी विश्वातील लोकप्रिय अभिनेता कपिल शर्माने अलीकडेच कॅनडामध्ये स्वतःचा कॅफे उघडला आहे.मात्र, एका आठवड्यात कपिलच्या कॅफेवर गोळीबार झाला होता, ज्याची जबाबदारी आता खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने घेतली असून कपिल शर्माला आणखी वाईट परिणामाला सामोरे जावे लागेल, अशी धमकीही दिली आहे.
कपिल शर्माचा कॅप्स कॅफे बऱ्याच काळापासून चर्चेत आहे, त्याने आणि त्याची पत्नी गिन्नीने कॅफेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. परंतु, कॅफेमध्ये गोळीबाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून, या घटनेने सर्वांना हादरवून सोडले आहे. मात्र, या गोळीबारात कोणत्याही व्यक्तीला दुखापत झालेली नाही. खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे आणि कपिलला आणखी वाईट परिणामांची धमकीही दिली आहे.
दहशतवादी हरजीत सिंगने दावा केला आहे की, कपिलने काही काळापूर्वी निहंग शिखांच्या पोशाखाची खिल्ली उडवली होती. या विनोदामुळे हरजीत सिंग खूप संतापला होता, ज्यासाठी त्याने कपिल शर्माच्या मॅनेजरशी बोलण्याचा प्रयत्नही केला, परंतु मॅनेजरकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्याने कपिलच्या कॅफेमध्ये गोळीबार केला. गोळीबारानंतर हरजीत म्हणतो की जर कपिलने त्याच्या विनोदाबद्दल माफी मागितली नाही तर भविष्यात आणखी वाईट परिणाम होतील.
हरजीत सिंग लड्डी हा पंजाबमधील नवांशहरचा रहिवासी आहे, जो खूप दिवसांपूर्वी देश सोडून गेला आहे. हरजीत बब्बर खालसा इंटरनॅशनलसाठी काम करतो. तो कॅनडामध्ये राहून भारतातील दहशतवादी कारवायांवरही लक्ष ठेवतो. हरजीत हा भारताच्या एनआयएचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. २ वर्षांपूर्वी एनआयएने त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीसही ठेवले होते.
