मुंबई, 28 जुलै – एकेकाळी भारतीय दुचाकी बाजारात अग्रस्थानी असलेली काइनेटिक मोटर्स पुन्हा नव्या जोमात मैदानात उतरली आहे. यंदा काइनेटिक डीएक्स ईव्ही या नावाने कंपनीने नवी इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली असून, रेट्रो डिझाइन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख मिलाफ यामध्ये पाहायला मिळतो. पुण्यातील एक्स-शोरूम किंमत डीएक्स मॉडेलसाठी ₹1,11,499 आणि डीएक्स प्लससाठी ₹1,17,499 इतकी आहे.
कंपनीने पहिल्या टप्प्यात फक्त 35,000 युनिट्स सादर करण्याचे ठरवले असून, बुकिंग ₹1,000 मध्ये सुरू असून डिलिव्हरी सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे.
डिझाइन आणि रंगसंगती
डीएक्स स्कूटरचे डिझाइन इटालियन डिझायनर्सच्या सहकार्याने करण्यात आले आहे. तीन पट्ट्यांचा फ्रंट ग्रिल, मेटल साइड बॉडी आणि प्रकाशमान “काइनेटिक” ब्रँडिंगमुळे स्कूटरला उठावदार रेट्रो लुक मिळतो. डीएक्स प्लस पाच रंगांत (लाल, निळा, पांढरा, सिल्व्हर, काळा) तर डीएक्स दोन रंगांत (सिल्व्हर व काळा) उपलब्ध आहे. 37 लिटर अंडर-सीट स्टोरेज, मजबूत मेटल बॉडी व रुंद फ्लोअरबोर्डसारखी उपयोगी वैशिष्ट्येही दिली आहेत.
परफॉर्मन्स आणि रेंज
ही स्कूटर 4.8kW बीएलडीसी हब मोटरने सुसज्ज असून ती 90 किमी प्रतितास टॉप स्पीड देते. यामध्ये 4.6kWh क्षमतेची LFP बॅटरी असून ती तब्बल 3,500 चार्ज सायकलसाठी सक्षम आहे. IDC प्रमाणित 116 किमी रेंज असलेल्या डीएक्सव्यतिरिक्त डीएक्स प्लस मॉडेलमध्ये क्रूझ लॉक तंत्रज्ञान असून, ते 25–30 किमी प्रतितास वेगात 150 किमीपर्यंत रेंज देते.
स्कूटरमध्ये हिल होल्ड, रिव्हर्स मोड, 22 अंश चढाई क्षमता आणि रेंज, पॉवर व टर्बो अशा तीन राइडिंग मोड्सचा समावेश आहे.
स्मार्ट कनेक्टिव्हिटी व सुरक्षा वैशिष्ट्ये
डीएक्स प्लस मध्ये ‘टेलीकिनेटिक्स’ नावाचा स्मार्ट सेफ्टी व कनेक्टिव्हिटी पॅक आहे. यात:
-
अँटी-थेफ्ट अलर्ट
-
जीपीएस ट्रॅकिंग
-
जिओ-फेन्सिंग
-
रिमोट लॉक/अनलॉक
-
“Find My Kinetic”
-
FOTA अपडेट्स
-
गाईड-मी-होम हेडलॅम्प्स
-
राईड अॅनालिटिक्स
-
“My Kyni Companion” व्हॉईस असिस्टंट – जो 16 भारतीय भाषांमध्ये काम करतो आणि विविध अलर्टसह वाढदिवसाच्या शुभेच्छाही देतो.
इतर वैशिष्ट्ये
-
8.8 इंचांचा डिजिटल डिस्प्ले
-
ब्लूटूथ, म्युझिक प्लेयर, वॉइस नेव्हिगेशन
-
काइनेटिक असिस्ट बटण – थेट ग्राहक सेवा जोडणी
-
ईझी की (कीलेस अॅक्सेस)
-
ईझी चार्ज (डीएक्स प्लससाठी – पेटंटेड रिट्रॅक्टेबल चार्जर)
-
ईझी फ्लिप – एका स्पर्शात पिलियन फुटरेस्ट उघडतो
वॉरंटी आणि उत्पादन
कंपनी 3 वर्षे किंवा 30,000 किमी वॉरंटी देते, जी वाढवून 9 वर्षे किंवा 1 लाख किमीपर्यंत करता येते. ही देशातील सर्वाधिक वॉरंटींपैकी एक आहे. काइनेटिक वॅट्स अँड व्होल्ट्स लिमिटेडच्या 87,000 चौरस फूट क्षेत्रातील उत्पादन केंद्रात ही स्कूटर बनवली जाते. आतापर्यंत ₹72 कोटींची भांडवली गुंतवणूक करण्यात आली असून, प्रवर्तकांनी आणखी ₹177 कोटी गुंतवण्याचे आश्वासन दिले आहे.