नांदेड, ५ ऑगस्ट – किनवट येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी ९५ लाख रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करावा, अशी ठोस मागणी माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोकराव चव्हाण यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर वकिल आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच निधी मंजूर होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
किनवट येथील विद्यमान न्यायालयाची इमारत निजामकालीन असून ती अत्यंत जीर्णावस्थेत आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाज सुरक्षिततेच्या दृष्टीने अडचणीचे ठरत होते. सद्यस्थितीत न्यायालयीन कामकाज नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात तात्पुरते सुरू आहे, मात्र तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत.
या पार्श्वभूमीवर नवीन न्यायालयीन इमारतीत एकूण चार न्यायालयीन कक्ष उभारण्यात येणार आहेत – दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तराची दोन न्यायालये, जिल्हा न्यायाधीशांचे एक, आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तराचे एक न्यायालय. या सुविधांसाठी ९५ लाख रुपयांचा प्रस्ताव नगरपालिकेकडून सादर करण्यात आला असून, त्यातून न्यायदालन, न्यायाधीश कक्ष, अभिलेख कक्ष आणि अन्य विभागीय कार्यालयांची उभारणी करण्यात येणार आहे.
खासदार अशोकराव चव्हाण यांनी या प्रस्तावाला गती देण्यासाठी तत्काळ पुढाकार घेतला. त्यांनी केवळ आपल्या मतदारसंघापुरते मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. न्यायालयीन सेवा सुलभ व सुसज्ज व्हावी, यासाठी त्यांनी पालकमंत्र्यांकडे निधी मंजुरीची मागणी केली आहे.
या प्रस्तावामुळे किनवट आणि माहूरसारख्या दुर्गम भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास न्यायालयीन सुविधा अधिक सुरक्षित, आधुनिक आणि कार्यक्षम होतील, अशी अपेक्षा वकिल वर्ग आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे.