नाशिक, 22 जुलै – “माझ्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण राजीनामा देण्यासारखे काहीही घडलेले नाही,” असे स्पष्ट मत राज्याचे कृषिमंत्री ऍड. माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मंत्रालयात ऑनलाइन रम्मी खेळल्याचा आरोप पूर्णपणे खोटा असून, माझ्या विरोधात रचल्या गेलेल्या षड्यंत्राचा हा भाग आहे, असा दावा त्यांनी केला.
रामेत येथील कृषी विभागाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कोकाटे म्हणाले की, “माझ्या प्रतिमेला डाग लावण्यासाठी काही विरोधक आणि माध्यमांनी मिळून खोटा प्रचार सुरू केला आहे. सोशल मीडियावर फिरत असलेला व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आला आहे. मी मंत्रालयात ऑनलाइन रम्मी खेळत नव्हतो.”
“या व्हिडिओचे सत्य स्पष्ट व्हावे म्हणून सखोल चौकशी व्हावी, आणि जर मी दोषी आढळलो, तर नागपूर अधिवेशनात मी स्वतः राज्यपालांकडे राजीनामा सादर करेन,” असेही कोकाटे यांनी ठामपणे सांगितले.
कोकाटे पुढे म्हणाले, “व्हिडिओ तयार करणारे व माझ्याविरोधात बदनामीकारक माहिती पसरवणाऱ्यांना मी लवकरच वकिलामार्फत नोटीस पाठवणार असून त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी काही लोक माझी बदनामी करण्याचा डाव आखत आहेत.”
“फक्त आरोप न करता, त्या आरोपांना ठोस पुरावे द्यावेत. जर काही चूक केली असेल तर मी जबाबदारी स्वीकारायला तयार आहे, पण आरोप बिनबुडाचे असतील तर त्याविरोधात मी कायदेशीर लढा देईन,” असे सांगत कोकाटे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
मंत्रालयातील संभाषणांचे ब्रिफिंग तपासल्यास सत्य बाहेर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “सत्याचा विजय होईल,” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी राजीनाम्याच्या मागणीस फेटाळून लावलं आणि विरोधकांना कायदेशीर लढाईची तयारी ठेवण्याचा इशाराही दिला.
